अ‍ॅपशहर

माळशिरसमध्ये तृतीयपंथीज्ञानदेव कांबळे सरपंच

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील सरपंचपदाचे उमेदवार ज्ञानदेव कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराला गावाने भरभरून मते देऊन विजयी केले. सोलापूरच्या इतिहासात तृतीयपंथी निवडून येण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे.

Maharashtra Times 17 Oct 2017, 11:30 pm
म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gram panchayat election in solapur
माळशिरसमध्ये तृतीयपंथीज्ञानदेव कांबळे सरपंच

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथील सरपंचपदाचे उमेदवार ज्ञानदेव कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराला गावाने भरभरून मते देऊन विजयी केले. सोलापूरच्या इतिहासात तृतीयपंथी निवडून येण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे.
तरंगफळ माळशिरस तालुक्यातील १८०० लोकवस्तीचे एक दुष्काळी गाव आहे. निवडणूक जाहीर होताच अनेक दिग्गज सरपंचपदासाठी तयारीला लागले होते. गावोगाव भटकून जीवन जगणारे ज्ञानदेव कांबळे यांनीदेखील सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांना भाजपची उमेदवारी देऊन निवडणुकीस उभे केले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जयसिंग साळवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. संपूर्ण प्रचारात त्यांच्या तृतीयपंथी असण्यावर टीका-टिप्पणी झाली, तरीही ज्ञानदेव उर्फ माऊली यांनी घरोघरी जात आपला प्रचार केला. संपूर्ण माळशिरस तालुक्याचे या गावाच्या लढतीकडे लक्ष होते. पहिल्या फेरीपासूनच कांबळे यांनी आघाडी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकविली. अखेरच्या फेरीत कांबळे यांना १७७ मताधिक्याने विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली. गावातील नऊ सदस्यांच्या जागांपैकी भाजपने सहा, तर राष्ट्रवादीच्या पॅनलने तीन जागा जिंकल्या. लोकांनी आपल्याला निवडून दिले व विश्वास दाखवला आता गावाचा विकास करून आपण त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे कांबळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
उत्तर- दक्षिण सोलापूरमध्ये
भाजपचे कमळ फुलले
उत्तर सोलापुरातील डोणगाव, नरोटेवाडी, कारंबा, रानमसले, पाकणी, मार्डी या सहा ग्रामपंचायती भाजप आणि मित्रपक्ष, गावडी दारफळ, शिवणी, कौठाळी आणि भवळे या चार ग्रामपंचायती काँग्रेस, अकोलेकाटी राष्ट्रवादी आणि नंदूर सर्वपक्षीय निवडून आले. उत्तरमध्ये एकूण १२ ग्रामपंचायती होत्या. ज्यामध्ये भाजप आणि मित्रपक्षाने ६ जिंकल्या तर काँग्रेसने ४ जिंकल्या आहेत.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील १७ पैकी १३ भाजपने तर उर्वरित ४ काँग्रेस आणि मित्रपक्षाने जिंकल्या आहेत. निंबर्गी, शंकरनगर, बंकलगी, आहेरवाडी, वांगी, विंचूर, मंद्रुप, तेरामैल, औज मंद्रुप आदी भाजपने जिंकल्या आहेत. कंदलगाव, तोगराळी आदी चार ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या आहेत.
राष्ट्रवादीला फटका
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली. राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून, स्थानिक आघाड्यांनी बाजी मारत आपले गड राखले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडविला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज