अ‍ॅपशहर

एसटी संपात सहभागी वडिलांनी पैसे दिले नाहीत; मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

MSRTC Workers Son Suicide: तीन महिन्यांपासून पगार नाही असं सांगत वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं सोलापूरमध्ये एका एसटी कामगाराच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Edited byगणेश कदम | Lipi 20 Jan 2022, 7:31 pm
सोलापूर: खर्चासाठी पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून वडिलांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायला घर सोडले अन् इकडे मुलानं घरात आईची साडी गळ्याला गुंडाळून आपली जीवनयात्रा संपविली. अमर तुकाराम माळी (वय २० रा. कोंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून हा दुर्दैवी प्रकार बुधवारी सोलापूरच्या कोंडी गावात घडलाय. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. (MSRTC Workers Son Commits Suicide in Solapur)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amar-Mali
अमर माळी


वाचा: किरण माने प्रकरणावरून राडे सुरूच; 'मुलगी झाली हो'चं शूटिंग बंद पाडण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न

अमर माळी याचे दयानंद महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण झाले होते. तो गेले काही दिवस शांत शांत असायचा. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या वडिलांनी माझे काम तीन महिने बंद आहे, मला पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ असे त्याला खडसावले. त्यानंतर ते एसटीचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी गेले. अमर हा देखील घराबाहेर गेला, त्यानंतर तो दुपारी घरी आला. घरात आई व त्याची चुलती जेवण करत होते. आईने त्याला जेवण्यासाठी आग्रह केला, मात्र तो नको म्हणत थोडा आराम करतो म्हणून स्वतःच्या खोलीत गेला. बराच वेळ झाले तरी तो बाहेर आला नाही म्हणून आईने त्याला आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीजवळ गेल्या. आवाज देऊ लागल्या, मात्र काहीच आवाज येत नव्हता. आतून कडी लावण्यात आली होती. मोठ्या भावानेही आवाज दिला, शेवटी खिडकीतून पाहिले असता अमर साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला व अमरला खाली उतरवले. अमरला पाहताच आईने हंबरडा फोडला. त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

वाचा: शशिकांत शिंदेंना पराभवाचा सलग तिसरा धक्का; साताऱ्यात पडद्यामागे काय घडतंय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज