अ‍ॅपशहर

सुशीलकुमार शिंदे यांनी नाकारले सोलापूर पालिकेचे मानपत्र

अमृतमहोत्सवानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रस्तावित सत्कार आणि मानपत्र स्वीकारण्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2016, 11:22 pm
सोलापूर : अमृतमहोत्सवानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रस्तावित सत्कार आणि मानपत्र स्वीकारण्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला आहे. अमृत महोत्सव समितीच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील यांचा एकमेव सत्कार स्वीकारणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले. या सत्कारावरून मोठा वाद सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shinde reluctant for felicitation
सुशीलकुमार शिंदे यांनी नाकारले सोलापूर पालिकेचे मानपत्र

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ४ सप्टेंबरला येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर शिंदे यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते; परंतु त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने विरोध केला.
या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, सार्वजनिकरीत्या वाढदिवस साजरा करण्याच्या मी विरोधातच आहे. आजवर माझा वाढदिवस मी कुटुंबासमवेतच छोटेखानी पद्धतीने साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईत कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मीच त्याला नकार देत सोलापुरात कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. त्यानुसार कार्यक्रम घेण्याचे गेल्या वर्षीच ठरले होते. मात्र, खर्चाला फाटा देत मोठ्या मनाने मी महापालिकेचे मानपत्र व सत्कार ४ सप्टेंबरला स्वीकारणार नाही.
यापूर्वी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आंध्र प्रदेशचा राज्यपाल झाल्यानंतर सोलापूर महापालिकेने मला मानपत्र दिले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मानपत्र स्वीकारण्यात काय अर्थ आहे, असा प्रतिप्रश्नही शिंदे यांनी केला.
शिंदे यांच्या वाढदिवसाचा मोठा सोहळा करण्यास माजी आमदार नरसय्या आडम यांनी विरोध केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, ‘आडमांना आरोप करण्याची सवयच आहे. शहरात ३० हजार घरकुले उभारणीला मी विरोध केल्याचा आरोप चुकीचा आहे. मी गरिबांना मदतच करतो. यापूर्वी त्यांच्या घरकुलांना पाणी आणि सरकारकडून कर्ज मी मिळवून दिले आहे. आम्ही दोघेही गरीब परिस्थितीतून पुढे आलो आहोत. त्यांचे मी कौतुकच करतो.’



वाढदिवसाचा कार्यक्रम काही लाख रुपयांतच होऊ शकतो. त्यासाठी दीड कोटी रुपये लागतातच कशाला? मी अशा खर्चाच्या विरोधातच आहे.

सुशीलकुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज