अ‍ॅपशहर

तरुणाच्या डोळ्यांदेखत स्वप्न जळून खाक; काही क्षणांत ७ ते ८ लाख रुपयांचं नुकसान

Solapur News : ऊसाला आग लागलेली दिसताच १० ते १५ तरुणांनी चोहोबाजूंनी आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2022, 12:34 pm
सोलापूर : मोठ्या कष्टाने वाढवलेला पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे घडली आहे. विजेच्या खांबावरील विद्युत वाहिनीच्या तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती असून यामध्ये सोमनाथ रामचंद्र अटकळे या शेतकऱ्याचं अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugarcane crop
ऊस जळून खाक


मिळालेल्या माहितीनुसार, हरीनगर येथील शेतकरी सोमनाथ रामचंद्र अटकळे यांचा को ८६०३२ जातीचा खोडवा पक्व झालेला व कारखान्याकडे गळीतास तोडून जाण्याच्या तयारीत असलेल्या उसाच्या वरील बाजूस १५ ते १६ वर्षांपूर्वी बसवलेले विजेचे खांब व तारा आहेत. मात्र मागील चार वर्षांत या वीज वहिनीच्या तारा सैल झाल्या असून मोठा झोळ पडल्याने धोकादायक स्थितीत आहेत.

'आम्हीच या परिसराचे भाई, दहशत असलीच पाहिजे'; पुण्यात तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य

वाऱ्याचा वेग वाढला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले तरी या तारा एकमेकांना घासून त्यांच्या घर्षणाने ठिणग्या पडतात. असाच प्रकार नुकताच घडला आणि तारांच्या खाली असलेल्या उसाने पेट घेतला. त्यामुळे आग भडकत पुढे गेली व या आगीमध्ये सोमनाथ अटकळे यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाला आग लागलेली दिसताच १० ते १५ तरुणांनी चोहोबाजूंनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.

सदरचा ऊस हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या पुरस्काराच्या यादीत होता. या ऊसाची विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांच्याकडे गळीतासाठी नोंदणी केलेली आहे. झालेलं नुकसान तातडीने शासनाकडून आम्हाला मिळावे अशी मागणी अटकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान किमान आता तरी वीज वितरण कंपनीने अशा धोकादायक बनलेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी या घटनेनंतर शेतकरी करू लागले आहेत.

महत्वाचे लेख