अ‍ॅपशहर

स्वाइन फ्लूने वाढवला ताप; मुंबईजवळच्या शहरांमधील वाढती रुग्णसंख्या धडकी भरवणारी

ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने जुलैमध्ये शिरकाव केल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या चार दिवसांत ठाणे पालिका क्षेत्रात ३२ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी २५ रुग्ण आढळले होते. एकूण ८५ रुग्णांची नोंद झाली.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 30 Jul 2022, 6:37 am
म. टा. वृत्तसेवा, ठाणे: ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूने जुलैमध्ये शिरकाव केल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या चार दिवसांत ठाणे पालिका क्षेत्रात ३२ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी २५ रुग्ण आढळले होते. एकूण ८५ रुग्णांची नोंद झाली. ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात स्वाइन फ्लूचा प्रसार मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. करोनानंतर आता स्वाइन फ्लूचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swine-flue


जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे अधिक रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी दिवसभरात २५ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या ८५वर गेली आहे. यापैकी ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत चार रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यामध्ये तीन रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात या आजाराचे रुग्ण आहेत. ठाणे शहरात २१ जुलैअखेर २० रुग्ण होते. मात्र शुक्रवारपर्यंत हा आकडा ५२वर पोहोचला आहे. दिवसाला साधारण ८ ते १० रुग्ण आढळून येत आहेत. २७ जणांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात गुरुवारी एकही रुग्ण आढळून आला नसून १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीनंतर नवी मुंबई शहरातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या शहरात गुरुवारी सहा रुग्ण आढळून आले, तर नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मिरा-भाईंदर शहरात एका रुग्णाची नोंद करण्यात आली. सध्या येथे दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठाणे शहरात गुरुवारी एकाचा मृत्यू

ठाणे शहरात यापूर्वी स्वाइन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी एका ४९ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला. सहव्याधी असलेला हा रुग्ण १९ जुलै रोजी उपचारासाठी दाखल झाला. त्यावेळी ताप जास्त असल्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्याची २६ जुलै रोजी स्वाइन फ्लूची चाचणी केली असता, त्याला स्वाइन फ्लूचे निदान झाले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख