अ‍ॅपशहर

वसईत ५४ हजार वीजग्राहक वाढले

महावितरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईमुळे अधिकृत वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षात एकूण ५४ हजार वीजग्राहक वाढल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 16 May 2019, 12:02 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electricity-consumer


महावितरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईमुळे अधिकृत वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षात एकूण ५४ हजार वीजग्राहक वाढल्याचे समोर आले आहे.

वसई तालुक्यातील अनेक भागांत वीजचोरीचे प्रकार वाढले होते. मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जाते, तसेच छुप्या मार्गाने आकडे (हुक) टाकूनदेखील मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केली जात असल्याचे समोर आले होते. यावर महावितरण विभागाच्या वतीने अनेक वेळा कारवाई करूनदेखील वीजचोरी होण्याचे प्रकार सुरूच होते. याचा फटका येथील सर्वसामान्य वीजग्राहकांना होत होता. यासाठी महावितरणतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जूचंद्र, वाकीपाडा, धानीव, पेल्हार, गोखिवरे, संतोष भुवन, कारगिलनगर, गोपचार पाडा, या सर्व भागांत सर्वात जास्त वीजचोरी करण्यात येत असल्याचे या सर्वेक्षणात महावितरणच्या लक्षात आले. त्यानंतर विशेष पथकाची नेमणूक करत वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा महावितरणने उचलला होता.

कारवाई केल्याने नव्याने अधिकृत वीजजोडणीसाठी अर्ज महावितरणकडे येऊ लागले होते. त्यानुसार त्यांना अधिकृत वीजजोडण्या देण्याचे काम महावितरणने केले. यामुळे वीजचोरीत घट झाली असून वीजग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. शहरात सुरुवातीला ८ लाख ४ हजार इतके वीज ग्राहक होते. यंदाच्या चालू वर्षात त्यात ५४ हजारांनी भर पडली असल्याने सध्या ८ लाख ५८ हजार इतकी वीजग्राहकांची संख्या झाली असल्याचे महावितरण वसई विभाग मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.

वसईसह वाडा परिसरातील ग्रामीण भागातदेखील मोठ्या संख्येने वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत ज्या भागात वीज नाही, अशा भागातील नागरिकांनाही वीजजोडण्या देण्यात आल्या असून त्यामध्ये १४ हजारांहून अधिक वीजजोडण्या देण्यात आल्या आहे. ज्या ज्या भागात वीजजोडण्या देण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, त्या ठिकाणी नवीन विद्युत खांब, विद्युत वाहिन्या व रोहित्र बसविण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज