अ‍ॅपशहर

वीजचोरांवर अंकुश

महावितरणच्या ठाणे सर्कलमध्ये वीजचोरांवर अंकुश आणण्यात अधिकाऱ्यांना यश आले असून मागील तीन वर्षांत वीजचोरीच्या प्रकरणात घट झाली आहे. मात्र वीजचोरीसाठी मीटरमध्ये होणाऱ्या टॅम्परिंगची (छेडछाड) प्रकरणे अधिक असून मीटरमधील छेडछाडीप्रकरणी १८२४ वीजचोरांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंडासह विजेची रक्कम वसूल केली आहे. याशिवाय १८५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Maharashtra Times 13 Dec 2017, 4:00 am
१८२४ जणांवर बडगा उगारत दंडाची वसुली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action against electricity looters
वीजचोरांवर अंकुश


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

महावितरणच्या ठाणे सर्कलमध्ये वीजचोरांवर अंकुश आणण्यात अधिकाऱ्यांना यश आले असून मागील तीन वर्षांत वीजचोरीच्या प्रकरणात घट झाली आहे. मात्र वीजचोरीसाठी मीटरमध्ये होणाऱ्या टॅम्परिंगची (छेडछाड) प्रकरणे अधिक असून मीटरमधील छेडछाडीप्रकरणी १८२४ वीजचोरांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंडासह विजेची रक्कम वसूल केली आहे. याशिवाय १८५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणची आर्थिक स्थिती नाजूक आहे. वीजबिलापोटीची थकबाकी अधिक असून थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणपुढे आहे. थकबाकीचा प्रश्न असताना वीजचोरांमुळे महावितरणला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. वीजतारांवर आकडे टाकून किंवा अनधिकृत वीजजोडणी घेऊन वीजचोरी करण्यात येत आहे. वीजचोरीसाठी हायटेक पद्धतीचाही मार्ग अवलंबवत असल्याचे दिसते. रिमोटच्या साहाय्याने तसेच मीटरमध्ये चीप बसवून विजेची चोरी होत असल्याने या चोरीचा थांगपत्ता अनेकदा वेळीच लागत आहेत. वीजचोरीमुळे अपघात घडण्याची शक्यता असून वीजचोऱ्या रोखण्यात महावितरणकडून विशेष प्रयत्न केले जातात. मात्र अद्याप वीजचोरीवर पूर्णपणे अंकुश आलेला नाही. परंतु वीजचोऱ्यांमध्ये घट होऊ लागली आहे.

महावितरणच्या ठाणे सर्कलमध्ये भांडुप, मुलुंड, वागळे इस्टेट, ठाणे १,२,३ या विभागात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. २०१५-२०१६ मध्ये आकडा टाकून वीजचोरी प्रकरणात ७५ केसेसमध्ये चोरांकडून ५ लाख ९ हजार रुपये दंडासह वसूल करण्यात आले आहे. १० गुन्हे दाखल केले असून दंडासह वीजबिल भरणाऱ्या ५८ वीज चोरांकडून बिलाची रक्कम वसूल करण्यात महावितरणला यश आले आहे. अनधिकृत वीज कनेक्शन घेणाऱ्या ११४ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९७ लाख तर मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरणाऱ्या १ हजार १३१ ग्राहकांकडून २ कोटी ४० लाख वसूल केले आहेत. तसेच ४८२ जणांवर गुन्हे दाखल केले असून वीजचोरी पकडल्यानंतर दंडासह वीजबिलाची रक्कम भरण्याची तयारी दाखवणाऱ्या ६७२ वीजचोरांकडून ३१ लाख ९२ हजार रुपये वसूल केले आहेत.

२०१६-२०१७ मध्ये आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३० जणांवर कारवाई करत २ लाखांहून अधिक रुपयांची रक्कम वसूल केली आहे. तसेच अनधिकृत जोडणी घेतल्याप्रकरणी २८जण महावितरणच्या कारवाईत सापडले असून त्यांच्याकडूनही दंडासह ७१ लाख ७४ हजार रुपये बिलाची रक्कम वसूल केली आहे. मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्या ५२० जणांची वीजचोरी पकडली आहे. ९६५ गुन्हे दाखल करण्यात आले असून वीज चोरणाऱ्या ३४० जणांकडून १५ लाखाऊन अधिक रुपये वसूल केले आहेत.

कारवाईचा धाक

चालू वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत वीजतारांवर आकडा टाकत वीज चोरणाऱ्या २० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. तसेच एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनधिकृत वीजजोडणी घेणाऱ्या नऊ जणांकडून ७ लाख महावितरणने वसूल केले आहेत. तर मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या १७३ ग्राहकांची वीजचोरी पकडत तब्बल दंडासह सुमारे ७३ लाख रुपये वसूल केले आहेत. तर ४१२ गुन्हे दाखल केले असून चोरी पकडल्यानंतर वीजबिल भरण्याची तयारी दाखवणाऱ्या १३२ ग्राहकांकडून ९ लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज