म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मुंबईतील गोरेगाव बस डेपो येथे पोपटाची पिल्ले विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे वनविभागाच्या पथकाने या भागात सापळा रचला. यावेळी सिद्धेश मांजरे (२५) हा गोरेगाव येथे राहणारा तरुण पोपट आणि चार पिलांस घेऊन तेथे पोहचल्यानंतर वनविभागाने त्याला ताब्यात घेतले. क्रॉफर्ड मार्केट येथून ही पिले आणल्याचे त्याने सांगितले.
गोरेगाव परिसरात पोपटाची विक्री होत असल्याची माहिती वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे वन विभागाचे अधिकारी नरेंद्र मुठे यांनी वनपाल रवींद्र तवर, मनोज परदेशी आणि वन पथकासह गोरेगाव गाठले. त्यांच्यासोबत असोसिएशनचे तरुणही सहभागी झाले होते. गोरेगाव पूर्व त्यांनी सापळा रचला असता सायंकाळी मांजरे हा तरुण पुठ्याच्या खोक्यासह तेथे पोहचला. त्याच्या जवळील खोक्यात पोपटाची चार पिल्ले सापडली. त्याच्या घरातही तपासणी केल्यानंतर घरातून एक पोपट ताब्यात घेण्यात आला. त्यावरून सिद्धेशवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पोपट पाळणे आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला २५ हजारांचा दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास यापैकी एक किंवा या दोन्ही शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे पोपट विकत घेणे आणि विक्री करणेही गुन्हा आहे, असे असोसिएशनच्या आदित्य पाटील यांनी सांगितले.