अ‍ॅपशहर

रिक्षाप्रवास स्वस्त? कल्याण-डोंबिवलीत नव्या दरपत्रकाचा विचार

मुजोर आणि मनमानी करत प्रवाशांना वेठीस धरणारे, भाडेवाढीच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसणारे रिक्षाचालक दरकपातीला राजी होण्याची शक्यता धूसरच असते. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा सीएनजीवर धावू लागल्यामुळे ‘पेट्रोल दरा’नुसार धावणाऱ्या रिक्षांच्या सध्याच्या दरामध्येही कपात होण्याची चिन्हे आहेत. सीएनजीचे दर हे पेट्रोलच्यापेक्षा खूप कमी असल्याने किमान दरात दोन रुपयांची कपात सुचवणारे नवे दरपत्रक दिवाळीपूर्वी सादर करून आरटीओ प्रवाशांना ‘अच्छे दिन’ दाखवण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 25 Sep 2016, 4:00 am
कल्याण-डोंबिवलीत लागू होणार नवे दरदत्रक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम auto fare will less
रिक्षाप्रवास स्वस्त? कल्याण-डोंबिवलीत नव्या दरपत्रकाचा विचार


म. टा. वृत्तसेवा, कल्याण

मुजोर आणि मनमानी करत प्रवाशांना वेठीस धरणारे, भाडेवाढीच्या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसणारे रिक्षाचालक दरकपातीला राजी होण्याची शक्यता धूसरच असते. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा सीएनजीवर धावू लागल्यामुळे ‘पेट्रोल दरा’नुसार धावणाऱ्या रिक्षांच्या सध्याच्या दरामध्येही कपात होण्याची चिन्हे आहेत. सीएनजीचे दर हे पेट्रोलच्यापेक्षा खूप कमी असल्याने किमान दरात दोन रुपयांची कपात सुचवणारे नवे दरपत्रक दिवाळीपूर्वी सादर करून आरटीओ प्रवाशांना ‘अच्छे दिन’ दाखवण्याची शक्यता आहे.

सीएनजी रिक्षांचे दर हे पेट्रोल रिक्षांपेक्षा दोन रुपयांनी कमी असल्यामुळे सीएनजीचे दरपत्रक लागू झाल्यानंतर प्रवाशांना भाडेकपातीची भेट मिळू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. सीएनजी पेट्रोल पंप सुरू झाल्यानंतर या शहरात रिक्षाभाडे सीएनजी दराने आकारण्यात येत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र पेट्रोलच्या दरानुसार रिक्षाभाडे आकारण्यात येत होते. कल्याणात रिक्षाभाडे इतर शहराच्या मानाने जास्त आहे. त्यातच रिक्षाचालकाची मुजोरी, जवळचे भाडे घेण्यास दिला जाणारा नकार, सुट्ट्या पैशासाठी घातली जाणारी हुज्जत, खासगी रिक्षासाठी केली जाणारी मनमानी आकारणी यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. या त्रस्त प्रवाशांनी दिलासा देण्याची मागणी केली असतानाच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या शहरांत सीएनजी पंप आता सुरू झाले आहेत. रिक्षाचालकांना सीएनजी कीट बसविण्याचे आदेश आर टीओकडून देण्यात आले असून त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देखील देण्यात आला आहे. यामुळे आज घडीला शहरात बहुतांशी रिक्षा सीएनजीवर चालत असताना प्रवाशांकडून मात्र पेट्रोलच्या दरानुसार भाडे आकारत लूट होत आहे. त्यातच आता आपल्याला भाडेवाढ हवी, अशी मागणी करत काही दिवसांपासून अनेक मार्गावरील रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवाढ आकारण्यास सुरुवात करत प्रवाशांना पुन्हा वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सीएनजीचे दरपत्रक लवकरात लवकर लागू करावे, अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कार्यालयाकडून लवकरच सीएनजीवर आधारित दरपत्रक लागू करण्याचे आश्वासन प्रवाशांना देण्यात आले आहे.

​रिक्षाचालकांचा विरोध?

सीएनजीचे दरपत्रक आणि पेट्रोलचे दरपत्रक यात २ रुपयाचा फरक असून सीएनजीचे दरपत्रक प्रवाशासाठी लाभदायक ठरणारे असल्यामुळे लवकरच प्रवाशांना रिक्षा भाडेकपातीची भेट मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, हे नक्की. अधिकृत भाडेवाढीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या रिक्षाचालकांकडून या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता असली तरी रिक्षाचालकांना मात्र हे दरपत्रक स्वीकारावेच लागणार आहे.

लाभ नेमका किती?

डोंबिवलीचा काही भाग, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या कुठल्याच भागांत सध्या मीटरवर रिक्षा धावत नाही. येथे बहुतांश ठिकाणी शेअर रिक्षा आणि खासगी रिक्षासाठी मनमानी भाडे हीच पद्धत रूढ आहे. त्यामुळे कागदोपत्री रिक्षांच्या दरात कपात झाली तरी त्याचा लाभ नेमका किती जणांना आणि कसा होणार हा प्रश्नच आहे.

सीएनजीवर आधारित दरपत्रक लागू केले जाणार आहेत. मात्र कपातीबाबत आताच काही सांगता येणार नाही. दरपत्रक आल्यानंतर कपात आहे की वाढ, हे स्पष्ट होईल.

नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज