अ‍ॅपशहर

एकाच दिवसात ठाण्यात १५ तर, कल्याण-डोंबिवलीत १३ रुग्ण वाढले!

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातही करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तब्बल २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2020, 11:46 am
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Covid


कल्याण-डोंबिवलीमध्ये करोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला आहे, असे वाटत असतानाच गेल्या २४ तासांत करोनाची लागण झालेले १३ जण सापडले आहेत. ठाण्यात पुन्हा एकदा मुंब्रा-कौसा भागातील आठ जणांसह १५ नवे करोनाबाधित सापडल्याने येथील रुग्णांची संख्याही १३०वर जाऊन पोहोचली आणि एका मृत्यूचीही नोंद झाली. रायगड जिल्ह्यातही करोना रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी पोलादपूरमध्ये एका करोनाबाधिताची नोंद झाली.

वाचा: 'फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना काम करू द्या'

ठाणे महापालिका हद्दीत गेल्या आठवडाभरात करोनाचे रुग्ण वेगवेगळ्या भागांत आढळून आले. कळवा, मुंब्रा-कौसा या विभागांप्रमाणेच वागळे इस्टेट, वर्तकनगर या भागांत करोनाचा जोर दिसून आला आहे. १४ हून अधिक पोलिसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळला आहे. मुंब्रा-कौसा भागातील करोनाबाधितांची संख्या आता २९ झाली असून वर्तकनगर, लोकमान्यनगर पाडा, विजयनगर, नौपाडा, पाचपाखाडी या भागातून नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

वाचा: 'बाळासाहेब अन् उद्धव यांच्या राज्यात हाच फरक'

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकाच दिवशी १३ रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या ७४ झाली. आतापर्यंत २६ जणांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत रुग्णांची संख्या एक ते दोन इतकीच येत होती. विलगीकरणात असलेल्या नागरिकांचे नमुने जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात एका वर्षाच्या चिमुकलीसह ६८ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे.

फोटोगॅलरी: लॉकडाऊनमध्ये 'मॉर्निंग वॉक' करायला गेले, अन्...

भिवंडीतही धोका वाढला!

भिवंडीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. येथील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे. तर नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या आता ६० झाली आहे. रायगड जिल्ह्यातही करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल, श्रीवर्धन, पोलादपूर या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज