अ‍ॅपशहर

सरकारकडून अंबरनाथची निराशा; सक्षम आरोग्य यंत्रणा उभारुनही निधीपासून वंचित

बदलापूर पालिकेने बीएसयूपी प्रकल्प, गौरी सभागृहात ५०० तर, अंबरनाथ पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये ७०० खाटांचे रुग्णालय उभारले होते. त्यामुळे खासगी रुग्णालयात लाखो रुपयांची बिले आकारली जात असताना दोन्ही पालिकांनी उभारलेल्या करोना रुग्णालयात मात्र करोनारुग्णांना मोफत उपचाराची सुविधा होती.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 6 Oct 2022, 1:15 pm
बदलापूर : आर्थिक स्थिती नसतानाही करोनाच्या संकटात ४२ कोटी रुपये खर्चून उत्तम आणि मोफत वैद्यकीय यंत्रणा उभारणाऱ्या बदलापूर नगरपालिकेला राज्य सरकारच्या अनुदानातून मुख्यमंत्र्यांनी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेला मोठा आर्थिक हातभार लागला आहे. मात्र कुठलीही आरोग्य यंत्रणा अस्तित्वात नसताना ७०० खाटांचे करोना रुग्णालय उभारत शेजारील शहरातील रुग्णांनाही सामावून घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेने पालिकेच्या तिजोरीतून ५० कोटींहून अधिक निधी उपचारासाठी खर्च करूनही नगरपालिकेला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम patient
सरकारकडून अंबरनाथची निराशा; सक्षम आरोग्य यंत्रणा उभारुनही निधीपासून वंचित


अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर दोन्ही शहरांमध्ये बाधितांवर उपचार करण्यासाठी एकही सक्षम वैद्यकीय यंत्रणा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे शहरातील रुग्णांना उपचारासाठी ठाणे, मुंबई येथे धाव घ्यावी लागत होती. मात्र राज्य सरकारची कुठलीही मदत नसताना अंबरनाथ तसेच बदलापूर नगरपालिकांनी पालिकेच्या तिजोरीतून निधी उपलब्ध करत, शहरात युद्धपातळीवर करोनाच्या उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा उभारली होती. बदलापूर पालिकेने बीएसयूपी प्रकल्प, गौरी सभागृहात ५०० तर, अंबरनाथ पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये ७०० खाटांचे रुग्णालय उभारले होते. त्यामुळे खासगी रुग्णालयात लाखो रुपयांची बिले आकारली जात असताना दोन्ही पालिकांनी उभारलेल्या करोना रुग्णालयात मात्र करोनारुग्णांना मोफत उपचाराची सुविधा होती. मात्र दोन्ही पालिकांची आर्थिक स्थिती नसतानाही बदलापूर पालिकेने स्वखर्चातून ४२ कोटी तर अंबरनाथ नगरपालिकेने जवळपास ५० कोटी रुपयांच्या निधीतून करोनारुग्णांना वेळेवर मोफत उपचाराची सुविधा दिली होती. त्यामुळे दोन्ही पालिकांच्या कामांचे विविध पातळीवर कौतुक करण्यात आले होते. तर, अंबरनाथ पालिकेच्या करोना रुग्णालयात अनेकदा शेजारील शहरातील रुग्णांनाही सामावून घेत उपचार दिले होते. त्यामुळे आर्थिक स्थिती नसतानाही नागरिकांना करोना संकटात उपचार देणाऱ्या पालिकांना आर्थिक मदतीचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधींनी करोना खर्चापोटी मदत देण्याचे निवेदन देत नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याबाबत प्रस्तावही मांडण्यात आला होता. अखेर मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बदलापूर पालिकेला करोना खर्चापोटी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९’ या खात्यातून २० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र करोनाकाळात बदलापूर पालिकेच्या बरोबरीने काम करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेला मुख्यमंत्री सहायता निधीतून करोना खर्चापोटी कुठलाही निधी मंजूर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकप्रतिनिधींकडून मागणीच नाही

मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत दोन्ही शहरांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी निधीबाबत मागणी केल्याने त्यांना यश आले आहे. मात्र अंबरनाथच्या लोकप्रतिनिधींनी बैठकीत कुठलीही मागणी केली नव्हती. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी पालिकेची बाजू मांडत असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांकडे शहराला निधी मिळून देण्यात कमी पडत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाचे लेख