अ‍ॅपशहर

महालक्ष्मी एक्स्प्रेस: रेल्वेचा 'जीवघेणा' कारभार उघड!

रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळेच २७ जुलैच्या मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी येथील पुराच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पूरपरिस्थिती आणि रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याची कल्पना २६ जुलैच्या रात्री रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे दामटवल्याचा गंभीर आरोप अंबरनाथच्या तहसीलदारांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 3 Aug 2019, 5:52 am
sandeep.shinde@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahalaxmi-express

शरद पवार, अंबरनाथ
ठाणे : रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळेच २७ जुलैच्या मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी येथील पुराच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. पूरपरिस्थिती आणि रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याची कल्पना २६ जुलैच्या रात्री रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुढे दामटवल्याचा गंभीर आरोप अंबरनाथच्या तहसीलदारांनी केला आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यास बदलापूरचे स्टेशन उपप्रबंधक जबाबदार असून, त्यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये कारवाई करावी, असे लेखी पत्रच अंबरनाथच्या तहसीलदारांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धाडले आहे.

२६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता सीएसएमटीहून निघालेली मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री साडेबाराच्या सुमारास वांगणीजवळ पुराच्या वेढ्यात अडकली. त्यानंतर पुढचे पाच तास रेल्वेकडून मदतीसाठी कोणतीही हालचाल झाली नाही. पहाटे साडेपाच वाजता प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे साकडे रेल्वेकडून घालण्यात आले. तब्बल १४ तासांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर एक हजार प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने आपल्या चुकांचे खापर स्थानिक प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. २९ जुलै रोजी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांना पत्र धाडले असून, बारवी धरणातील पाणी सोडल्याची कल्पना आम्हाला न दिल्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याचा दावा केला आहे. मात्र, हे आरोप खोडून काढतानाच प्रत्युत्तरादाखल धाडलेल्या पत्रात तहसीलदार जयराज देशमुख यांनी रेल्वेचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणला आहे. तसेच, '२६ आणि २७ जुलै रोजी बारवी धरणातून विसर्ग झाल्याची कोणतीही नोंद नाही, त्यामुळे रेल्वेची माहिती चुकीची असून, असे पत्र देण्यापूर्वी खात्री करून घ्यावी', असा टोलाही या पत्रात लगावण्यात आला आहे.

'हमारे साहब यूपीएससी है'

पूरपरिस्थितीबाबतची माहिती देण्यासाठी गेलेल्या तहसीलदार कार्यालयातील कोतवाल रवींद्र शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी प्रशांत कुमावत यांना फोन केला. कुमावत यांनी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तालुक्यातील पुरपरिस्थितीबाबत माहिती दिली. मात्र, रेल्वे स्थानकातील परिस्थितीबाबत विचारणा केली असता 'तुम्हारा तहसीलदार 'एमपीएससी' है, हमारे साहब 'यूपीएससी' है' अशा अरेरीवाच्या भाषेत उत्तर देण्यात आल्याची बाबही तहसीलदार जयराज देशमुख यांनी पत्रात अधोरेखित केली आहे. (घटनाक्रम तपासा...९)

रेल्वेचा आरोप

बारवी धरणातील पाणी सोडल्याची कल्पना आम्हाला न दिल्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली...

प्रशासनाचे प्रत्युत्तर

२६ जुलैच्या रात्री रुळांवरील पाण्याची कल्पना रेल्वेला दिली होती. त्यानंतरही एक्स्प्रेस पुढे नेली...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज