अ‍ॅपशहर

नायगाव पूर्वेतील वीजसमस्या मार्गी लागणार

वसई नायगाव पूर्वेकडील गावांत वीज वितरणविषयक विविध समस्या आहेत. या सर्व गावांतील समस्या, वीज ग्राहकांच्या मागण्यांबाबत सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Maharashtra Times 13 Dec 2017, 4:00 am
महावितरणच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electricity problems in the east of naigaon will be solved
नायगाव पूर्वेतील वीजसमस्या मार्गी लागणार


म. टा. वृत्तसेवा, वसई

वसई नायगाव पूर्वेकडील गावांत वीज वितरणविषयक विविध समस्या आहेत. या सर्व गावांतील समस्या, वीज ग्राहकांच्या मागण्यांबाबत सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी गावांमधील समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

नायगाव पूर्व भागातील जूचंद्र, चंद्रपाडा, वाकीपाडा, बापाणे, टिवरी, राजावली, सुकालपाडा, कोल्ही, चिंचोटी, मालजीपाडा, ससुपाडा, ससुनवघर, खोलांडे, कामण, पोमण, नागले, शिल्लोतर येथील शहरी तथा ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात असलेल्या विविध समस्या मांडण्यात आल्या. जुने विजेचे खांब, जुन्या तारा, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, नवीन सबस्टेशन, फॉल्टी मीटर, वीजदेयक वितरण व त्याबाबतच्या उपाययोजना अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

महावितरणचे वसई मंडळचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर, नवे कार्यकारी अभियंता सुनील किन्नड यांनी निवेदन स्वीकारले. माजी महापौर नारायण मानकर, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णा माळी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नायगाव पूर्व भागातील वीज वितरण व्यवस्थेतील विविध समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांना गावनिहाय माहिती दिली. नायगाव पूर्व भागाची लोकसंख्या वेगाने वाढत असून त्यामुळे विजेची मागणीही प्रचंड आहे. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार वीजवितरण क्षमता वाढवावी, यंत्रणा सक्षम करावी, नागरिकांना नियमित वीजपुरवठा होणे गरजेचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

सध्या वीजवितरण कारभाराबाबत नायगाव पूर्वेकडील गावातील रहिवाशांच्या मनात तीव्र नाराजी असून वीज वितरणात वेळीच सुधारणा व आवश्यक उपाययोजना होणे गरजेचे आहे. यावेळी मांडलेल्या समस्या व वीज सुधारणा होण्याबाबतची कामे याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत पुढील कार्यवाही केली जाईल, असे अरुण पापडकर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टिवरीचे उपसरपंच नुतनकुमार भोईर, मालजीपाडाचे उपसरपंच संदीप पाटील, नागलेचे सरपंच सदाशिव कोदे , पोमण येथील भालचंद्र भोस्कर तसेच कार्यकर्ते हेरंब पाटील, आशिष पाटील, सागर माळी व इतर पदाधिकारी तसेच या परिसरातील नागरिकही उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज