अ‍ॅपशहर

अपंगाच्या स्वच्छतागृहात धडधाकटांची घुसखोरी

उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील अपंगांसाठीच्या राखीव डब्यांमध्ये धडधाकट प्रवाशांची घुसखोरी रोजची असली तरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहामध्ये घुसखोरी करू दिल्या प्रकरणावरून अपंग व्यक्तीने थेट कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Times 22 Jan 2018, 4:57 pm
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 05


उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील अपंगांसाठीच्या राखीव डब्यांमध्ये धडधाकट प्रवाशांची घुसखोरी रोजची असली तरी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहामध्ये घुसखोरी करू दिल्या प्रकरणावरून अपंग व्यक्तीने थेट कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपंगांची हेळसांड केल्याचा ठपका ठेऊन या प्रकरणी कोपरी पोलिसांनी कंत्राटदारासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश वर्मा (५६), जिनारूल मंडल (३१), मोहीदूर कुटुस (२६) असे आरोपींची नावे आहे. यापैकी एक जण फरार आहे. तर, अजितसिंग सिंह (३९) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव असून ते प्रहार अपंग रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष आहे.

ठाण्याच्या स्वच्छतागृहाचा वापर अपंग व्यक्तींऐवजी अन्य सामान्य व्यक्ती करत असल्याचे निदर्शनात येताच त्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ येथे राहणारे अजितसिंह हे व्यवसायाने शिक्षक असून ते शनिवारी ठाणे स्थानकात आले होते. त्यावेळी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ते रेल्वे प्लॅटफॉम नंबर दहावरील अपंगासाठी राखीव शौचालयात गेले असता ते वापरात होते. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता तेथे काही महिला या शौचालयाचा वापर अंघोळ करण्यासाठी करत होत्या. त्या अपंग नसतानाही त्याचा वापर करत होत्या. त्यावेळी येथील एका तरुणाने सकाळच्या वेळात येथे अपंगांशिवाय अन्य सामान्य मंडळी गर्दी करून आंघोळ करतात, अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे अजितसिंग यांनी पोलिस ठाणे गाठून येथील कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला.

पंतप्रधान आणि रेल्वे प्रशासनाला ट्विट…

अपंगासाठी राखीव असलेल्या या स्वच्छतागृहामध्ये रिकाम्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तसेच, येथील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्तीने या सर्वाचे चित्रिकरण केले. तसेच ही माहिती स्टेशन मॅनेजरला सांगितली, मात्र त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच थेट पंतप्रधान आणि रेल्वे प्रशासनाला ट्विट केली. त्यानंतर सूत्रे फिरून कंत्राटदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज