अ‍ॅपशहर

दिवा-कळव्याच्या पादचारी पुलांचा विस्तार

दिवा आणि कळवा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांचा विस्तार करून सर्व प्लॅटफॉर्म जोडण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अपुऱ्या पादचारी पुलांमुळे रेल्वे प्रवाशांना विनाकारण रेल्वेरूळ ओलांडावे लागत होते.

Maharashtra Times 29 Jul 2018, 2:42 am
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diva


दिवा आणि कळवा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांचा विस्तार करून सर्व प्लॅटफॉर्म जोडण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अपुऱ्या पादचारी पुलांमुळे रेल्वे प्रवाशांना विनाकारण रेल्वेरूळ ओलांडावे लागत होते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी पादचारी पुलांची जोडणीकामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटीपर्यंतचा खर्च येणार आहे. रेल्वेकडून याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील १८ महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. दिवा रेल्वे स्थानकातील मधल्या पुलाची लांबी वाढवून सर्व प्लॅटफॉर्म जोडण्यात येणार आहेत, तर कळव्यात नव्या प्लॅटफॉर्मवरील पादचारी पुलाची जोडणी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेसूत्रांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकामध्ये सध्या दोन पादचारी पूल आहेत. त्यापैकी केवळ ठाणे दिशेकडील एक पादचारी पूल पूर्व आणि पश्चिमेकडे जोडलेला आहे. तर मधला पूल केवळ प्लॅटफॉर्म दोन आणि चार पाचवर उतरला आहे. पूर्वेकडील भागामध्ये जाण्यासाठी या पुलाचाही काहीच उपयोग होत नाही. याच पुलावर रेल्वे प्रशासनाकडून सरकते जिने बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपुरा पूल असल्यामुळे या पादचारी पुलावर तुरळक गर्दी असताना हा जिना येथे बसवत असल्यामुळे त्यावरून प्रवाशांनी मोठा संताप व्यक्त केला होता. हा पादचारी पूल पूर्वेकडे जोडून देण्याचे अश्वासन त्यावेळी रेल्वेकडून प्रवाशांना देण्यात आले होते. अखेर रेल्वेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. मधल्या पुलाची लांबी वाढवून तो पूर्वेकडे उतरवण्यात येणार असल्याने दिव्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलामुळे दिव्यातील रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या पुलाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी कल्याण दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलासही गती देण्याचा आग्रह प्रवाशांकडून करण्यात आला.

कळवा रेल्वे स्थानकातून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी कळवा रेल्वे स्थानकात नव्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. या नव्या प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी सध्या कोणतेही पादचारी पूल नसल्यामुळे कळवा रेल्वे स्थानकातील जुन्या पादचारी पुलांची लांबी वाढवली जाणार आहे. हे पादचारी पूल नव्या प्लॅटफॉर्मला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना नव्या प्लॅटफॉर्मवरील प्रवास करता येणार आहे. सध्या या नव्या प्लॅटफॉर्मवरून कोणत्याही प्रकारची सेवा सुरू झाली नसली तरी पाचवी-सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर या पुलाची मदत होऊ शकणार आहे. या दोन्ही पुलांसाठी निविदा काढण्यात आली असून हा खर्च १ कोटीच्या आसपास असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज