अ‍ॅपशहर

मंदिरांमधील प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

मोठ्या श्रद्धेने आणि निःसंकोचपणे सेवन केल्या जाणाऱ्या प्रसादातूनही विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही बाब यापूर्वी तितकीशी गांभीर्याने घेतली जात नव्हती. मात्र आता राज्यातील मंदिरे अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आली असून, दर्शनासाठी भक्तांची अधिक गर्दी होते, अशा मंदिरांची यादी तयार केली जाणार आहे.

Maharashtra Times 19 Aug 2017, 4:12 am
गुणवत्तेसाठी ‘एफडीए’कडून विशेष प्रशिक्षण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fda keeps vigil on prasad
मंदिरांमधील प्रसादावर ‘एफडीए’ची नजर


महेश गायकवाड, ठाणे

मोठ्या श्रद्धेने आणि निःसंकोचपणे सेवन केल्या जाणाऱ्या प्रसादातूनही विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही बाब यापूर्वी तितकीशी गांभीर्याने घेतली जात नव्हती. मात्र आता राज्यातील मंदिरे अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आली असून, दर्शनासाठी भक्तांची अधिक गर्दी होते, अशा मंदिरांची यादी तयार केली जाणार आहे. तसेच प्रसाद बनवताना कोणती काळजी घ्यावी, स्वच्छ वातावरण हवे, प्रसादाची गुणवत्ता आदींविषयी तज्ज्ञामार्फत मंदिर कमिटींच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तशा सूचना ‘एफडीए’च्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मंदिरांत देवदर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. तासनतास रांगा लावून दर्शन घेतल्यानंतर ते प्रसादाचा आस्वाद घेतात. शिवाय घरच्यांसाठीही सोबत प्रसाद नेतात. अनेक देवस्थानांच्या ठिकाणी मोफत महाप्रसादाचे वाटप केले जाते, तर काही ठिकाणी प्रसादासाठी अल्प किंमत आकारली जाते. श्रद्धेपोटी भाविक प्रसादाविषयी शंका उपस्थित करत नाहीत. मात्र अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून हा प्रसाद तयार केला जातो का, हे पाहणे आवश्यक आहे. कारण प्रसादातून विषबाधा होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते.

डॉ. दराडे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात भविकांची गर्दी असलेल्या मंदिरांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, मुंबई या सातही विभागांना दिल्या आहेत. ही यादी १ सप्टेंबरपर्यंत सादर करावयाची असून, त्यानंतर मंदिर कमिटीचे पदाधिकारी, ट्रस्टी यांना तज्ज्ञांद्वारे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काय असेल प्रशिक्षण?

प्रसाद बनवताना कोणती खबरदारी घ्यावी, अन्न सुरक्षेबाबतचे नियम, तसेच कर्मचाऱ्यांची स्वच्छता, चांगल्या वातावरणात प्रसाद बनवणे याविषयी माहिती प्रशिक्षणात ‘एफडीए’कडून दिली जाणार आहे. शिवाय एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रसाद तयार होणाऱ्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेची पाहणी करणार असल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज