अ‍ॅपशहर

तंबूतील चित्रपटांच्या आठवणींना उजळा

तंबूतील चित्रपट इतिहासजमा झाले असले, तरी अजूनही या तंबूतील चित्रपटांविषयी खास आकर्षण सिनेमाप्रेमींमध्ये असते. म्हणूनच तंबूतील चित्रपटांना वेगळ्या धाटणीत प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न ‘किफ’च्या माध्यमातून केला जात आहे.

Maharashtra Times 23 Dec 2016, 3:00 am
कल्याणमध्ये रंगणार फिल्म फेस्टिव्हल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम film festival in kalyan
तंबूतील चित्रपटांच्या आठवणींना उजळा


म. टा. वृत्तसेवा, कल्याण

तंबूतील चित्रपट इतिहासजमा झाले असले, तरी अजूनही या तंबूतील चित्रपटांविषयी खास आकर्षण सिनेमाप्रेमींमध्ये असते. म्हणूनच तंबूतील चित्रपटांना वेगळ्या धाटणीत प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न ‘किफ’च्या माध्यमातून केला जात आहे.

आपल्या दिमाखदार आणि नेत्रदीपक आयोजनामुळे कल्याण शहराच्या नावलौकिकात भर घातलेल्या ‘किफ’ म्हणजेच कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१६ला येत्या रविवारपासून सुरुवात होत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, गायकांच्या मांदियाळीबरोबरच विविध भाषांतील उत्कृष्ट सिनेमे कल्याणकरांना या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळणार आहेत. वातानुकूलित (एअर कंडिशन) तंबू यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती आयोजक संदीप गायकर यांनी दिली. या फेस्टिव्हलची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गायकर यांच्यासह दिग्दर्शक विनोद शिंदे, मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम अळेकर आदी उपस्थित होते. किफचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून येत्या २५ ते २९ डिसेंबर रोजी कल्याण पश्चिमेकडील फडके मैदानावर हा सोहळा रंगणार आहे. कट्यार काळजात घुसली, हाफतिकीट, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी, यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांसोबत हिंदी, मल्याळम, गुजराती, इंग्रजी या भाषांमधील उत्कृष्ट आणि दर्जेदार असे १५ चित्रपट या महोत्सवात पाहता येणार आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती फेस्टिव्हलचे दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी दिली. दिवसा दररोज ३ चित्रपट दाखवण्यात येणार असून संध्याकाळी सांगीतिक आणि नृत्याच्या कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. अमृता नातू, ज्ञानेश्वर मेश्राम, रोहित राऊत, मंगेश बोरगावकर, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, सायली पंकज, सावनी रवींद्र यांच्यासारखे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि पार्श्वगायिका त्यात आपली कला सादर करणार आहेत. तर प्रियदर्शन जाधव, भार्गवी चिरमुले, सिया पाटील, मनिषा केळकर, हेमलता बाने, मिरा जोशी, रिचा अग्निहोत्री, आशिष पाटील, विजय कदम, माधवी जुवेकर, प्रसाद खांडेकर, श्याम राजपूत, पूजा नायक, शर्मिला शिंदे, स्मिता तांबे, नकुल घाणेकर, डीआयडी फेम प्रिन्स, युनायटेड किंगडम ग्रुप आदींचा परफॉर्मन्स पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.

या महोत्सवाच्या सांगता समारंभात मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे विद्यमान अध्यक्ष जयंत सावरकर यांना, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची भूमिका गाजवलेले रणजित यांना कार्यगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज