अ‍ॅपशहर

दिव्यात तीन विशेष गाड्यांना थांबा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतून सोडण्यात आलेल्या गाड्यांपैकी तीन गाड्यांना हा थांबा देण्यात येणार आहे.

Maharashtra Times 8 Sep 2018, 7:47 am
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम konkan-railway


गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतून सोडण्यात आलेल्या गाड्यांपैकी तीन गाड्यांना हा थांबा देण्यात येणार आहे. दिवा आणि पलीकडच्या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. एलटीटी- झारप, सीएसएमटी-रत्नागिरी आणि सावंतवाडी-सीएसटी या तीन गाड्यांचा यात समावेश आहे. या गाड्यांना थांबा मिळावा म्हणून दिव्यातील प्रवाशांनी आक्रमक मागणी केली होती. तर, शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलनाची घोषणा केली होती. या सर्वाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अखेर दिव्यातील थांब्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या थांब्यामुळे कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूरपासून ते कर्जत आणि कसारापर्यंतच्या प्रवाशांना दिवामार्गे कोकणात जाणे शक्य होणार आहे. शिवाय, ठाणे रेल्वे स्थानकात या गाड्यांसाठी होणारी गर्दीही कमी होऊ शकणार आहे. प्रवाशांचा अतिरिक्त लोकल प्रवासही कमी होणार आहे.

'मटा'चे आभार…

दिवा स्थानकात नव्या गाड्यांना थांबा मिळत नसल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. तर, दिव्यातील प्रवाशांच्या आंदोलनालाही प्रसिद्धी दिल्यामुळे हा थांबा मिळाल्याची भावना प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिवा प्रवासी संघटनेकडून 'मटा'चे आभार मानण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज