अ‍ॅपशहर

कचराव्यवस्थापन कागदावर

नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकांकडून जनजागृतीसह नागरिकांना कायद्याचा धाक दाखवण्यात येत आहे. मात्र अंबरनाथ, बदलापूर पालिका प्रशासन घनकचरा जमा करत डम्पिंगवर टाकणाऱ्या कंत्राटदाराला कायद्याचा धाक दाखवण्यात अपयशी ठरत आहे.

Maharashtra Times 20 Jul 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage management on paper in ambernath badlapur
कचराव्यवस्थापन कागदावर


नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकांकडून जनजागृतीसह नागरिकांना कायद्याचा धाक दाखवण्यात येत आहे. मात्र अंबरनाथ, बदलापूर पालिका प्रशासन घनकचरा जमा करत डम्पिंगवर टाकणाऱ्या कंत्राटदाराला कायद्याचा धाक दाखवण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागरिक जरी कचरा विलगीकरणाचा नियम पाळत असले, तरी कंत्राटदाराकडूनच या उपक्रमाला हरताळ फासला जात आहे.

अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. या दोन्ही पालिकांनी घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईच्या नोटिसा मालमत्ताधारकांना बजावल्या. त्यानुसार १ जून २०१७पासून ओला-सुका एकत्र कचरा घंटागाडी स्वीकारणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या या नोटिशीपूर्वीच अनेक गृहनिर्माण सोसायटीतील नागरिक ओला, सुका कचरा वेगळा करून ठेवत आहेत, मात्र नागरिक जरी नगरपालिकांच्या नियमांचे पालन करत असले, तरी शहरातील घनकचरा उचलणाऱ्या अनेक घंटागाड्यांमध्ये ओला, सुका कचरा वेगळा जमा करण्याची सोयच नसल्याने कंत्राटदारांकडून या नियमाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे कचरा घंटागाडीतून डम्पिंगवर एकत्रच टाकण्यात येत आहे. मे महिन्यात याबाबत आरोग्य विभागाच्या विजय कदम यांनी येत्या १ जूनपासून पालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या गाड्याही कचरा वेगवेगळा करूनच कचरा घेणार आहेत. तशा सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्याचे सांगितले होते. तसेच बदलापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनीही वेगळा कचरा जमा करण्याचा नियम न पाळल्यास कंत्राटदारांवर नोटिशी देऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

मात्र अद्याप परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही पालिकांची घनकचरा व्यवस्थापनाची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करत शहरातील घनकचरा व्यवस्थापनेसाठी पालिका जी शिस्त नागरिकांना लावत आहे, ती शिस्त कंत्राटदाराला कधी लावणार, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

कचरा वेगळा जमा करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल.

- प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी, बदलापूर पालिका

कचरा विलगीकरणाची प्रक्रिया विकेंद्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच ओला, सुका कचरा वेगळा केला जाईल.

- देविदास पवार, मुख्याधिकारी, अंबरनाथ पालिका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज