अ‍ॅपशहर

राज्यातील मद्यआयात चौकशीच्या फेऱ्यात

परदेशातून आयात केलेल्या मद्याचे उत्पादन शुल्क बुडवण्याबरोबर कंपन्या कस्टम ड्युटी भरत नाहीत. सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक चुना लावणाऱ्या कंपन्यांच्या बनवेगिरीची काही काही प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क खडबडून जागे झाले आहे.

Maharashtra Times 23 Apr 2018, 6:26 am
महेश गायकवाड, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम liquer


परदेशातून आयात केलेल्या मद्याचे उत्पादन शुल्क बुडवण्याबरोबर कंपन्या कस्टम ड्युटी भरत नाहीत. सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक चुना लावणाऱ्या कंपन्यांच्या बनवेगिरीची काही काही प्रकरणे समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क खडबडून जागे झाले आहे. परदेशातून विदेशी मद्याची आयात करणाऱ्या राज्यातील सर्वच ट्रेडची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.

औरंगाबादमधील एका कंपनीने परदेशातून बल्क स्कॉच कॉन्सट्रेट विस्की आयात केली होती. मात्र नंतर अनुज्ञप्तीमधील नोंदवही पीएल-४, बिल ऑफ इंट्री, इन्व्हॉइस, वाहतूक पास (टीपी) यांच्या चौकशीत अनेक त्रुटी उघडकीस आल्या होत्या. कंपनीने तब्बल १७ कोटींहून अधिक उत्पादन शुल्क बुडवले होते. नंतर या कंपनीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने दंडासह ५३ कोटी रुपयांची वसुलीची कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. शिवाय कंपनीने कस्टम ड्युटी भरली नव्हती. वाहतूक पासवर खाडाखोड करण्यात आली होती. यातून सरकारला मिळणाऱ्या महसूलावर डल्ला मारण्यात येत होता. याशिवाय काही दिवसापूर्वी ढाल फूड्स अँड ब्रेवरिज प्रा. लि. कंपनीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या कंपनीवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत विदेशी मद्याचा साठा जप्त केला होता. परदेशातून आयात केलेल्या मद्याच्या बाटल्यावर खरेदीदार तसेच विक्रीदार आणि एमआरपी लेबलची नोंदच नव्हती. परिणामी सरकारचे लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे. वाहतूक परवान्याचाही गैरफायदा घेण्यात आला होता. या सर्व बाबी समोर आल्यानंतर मद्यतस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे दिसते.

झाडाझडतीला सुरुवात

या सर्व प्रकरणानंतर परदेशातून मद्याची आयात करणारे ट्रेड यांनी कस्टम ड्युटीसह अबकारी शुल्क भरले की याची झाडाझडती घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवात केली आहे. राज्यात ७३च्या आसपास ट्रेड असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिली. चौकशीत कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून या तपासणीत अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज