अ‍ॅपशहर

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचा आग्रह

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 23 Jun 2021, 3:54 pm
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो पाच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे या प्रक्रिया वेगाने सुरू करण्याचा आग्रह धरला आहे. याशिवाय बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा तसेच भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम insistence of bhiwandi kalyan metro route
भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचा आग्रह


भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची सोमवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्याप सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. तर कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सोय होणार आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली. एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते काँक्रिटीकरण या मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, अशा मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज