अ‍ॅपशहर

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची; खारेगाव उड्डाणपूलाच्या श्रेयावरुन लढाई

खारेगाव उड्डाणपूलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. त्यामुळे सुरुवातीला कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले होते.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2022, 3:47 pm

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी आल्यानंतर हा तणाव निवळला
  • शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'महाविकासआघाडी विजय असो', अशा घोषणा दिल्या
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम NCP Shivsena
खारेगाव उड्डाणपूलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला.
ठाणे: कळव्यातील खारेगाव उड्डाणपूलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र, थोड्याचवेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सगळे एकच आहोत, असे सांगत दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.
खारेगाव उड्डाणपूलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. त्यामुळे सुरुवातीला कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत बॅनर्स आणि झेंडे लावायला सुरुवात केली. तेव्हा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. यानंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उमेश पाटील घटनास्थळी आले. तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणबाजी सुरु केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी आणि उमेश पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समजते. मात्र, काहीवेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. परंतु, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या बाजूला उभे असल्याचे दिसत होते. अखेर एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी आल्यानंतर हा तणाव निवळला. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'महाविकासआघाडी विजय असो', अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. खारेगाव उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले होते. मफतलाल कंपनीची जमीन मिळत नसल्यामुळे उड्डाणपूलाचे काम सातत्याने लांबणीवर पडत होते.

महत्वाचे लेख