अ‍ॅपशहर

एलईडी फिशिंगबंदीची कठोर अंमलबजावणी हवी

समुद्रात एलईडी लाइट फिशिंगवर असलेल्या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी तटरक्षक दल आणि स्थानिक प्रशासन यांना नुकतेच दिले आहेत.

Maharashtra Times 27 Feb 2018, 8:08 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need strict enforcement of led fishing ban
एलईडी फिशिंगबंदीची कठोर अंमलबजावणी हवी


समुद्रात एलईडी लाइट फिशिंगवर असलेल्या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी तटरक्षक दल आणि स्थानिक प्रशासन यांना नुकतेच दिले आहेत. प्रभू यांच्या नवी दिल्ली येथील दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत नॅशनल फिश वर्कर्स फोरम व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती या मच्छिमार संघटनांनी हा मुद्दा मांडला होता.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एलईडी लाइट फिशिंगच्या वादासंदर्भात भाजपचे सिंधुदुर्गाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या नवी दिल्ली येथील दालनात झालेल्या बैठकीत या मुद्द्यासह इतर अनेक समस्यांवर चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव एस. के. पटनाईक, तटरक्षक दलाचे कमांडन्ट भीम सिंह कोठारी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सांवइकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर व इतर उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

एलईडी लाइट फिशिंगमुळे पारंपरिक मच्छिमार व मत्स्योद्योग यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त केली. तटरक्षक दलाने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवावे, तसेच कारवाईचे अधिकार व्यापक आणि स्पष्ट करावेत, सागरी राज्यांच्या मत्स्यद्योग विभागाचे कार्यक्षेत्र १२ सागरी मैलांवरून वाढवून २५ सागरी मैल करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

कायद्यात बदलासाठी प्रयत्न

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम १९८१ च्या १४व्या कलमामध्ये अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाईसंदर्भात आवश्यक बदल करण्याची मागणी काळसेकर यांनी केली. या विषयात पूर्ण अभ्यास करून कायद्यात आवश्यक बदलांसाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार सावईकर यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज