म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई पूर्वेकडील अंबाडी पुलाजवळ एका कारने ऑटोरिक्षा, स्विफ्ट कार आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाचाही समावेश आहे.
वसई पूर्वेकडील गोखिवरेच्या रेंज ऑफिस येथील माधव नगर येथे राहणारा रोहित हातगे (२६) हा रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पॉइंट सिग्नल समोरील यू टर्न जवळील रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या मारुती सुझुकी कारने जोरदार धडक दिली. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येत असलेल्या या कारने नंतर रिक्षा आणि स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षामधील प्रवासी हरिकुमार आर. डी (५९) यांच्यासह इतर आठ जण जखमी झाले आहेत. तसेच स्विफ्ट कारमधील माजी पोलिस अधिकारी काशीनाथ पाखरे यांचा मुलगा, सून, नातू हे देखील जखमी झाले आहेत. जखमींना प्लॅटिनम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक देणाऱ्या कारचा चालक आशीष गुलाबचंद यादव (३०) याला पोलिसांनी पकडले असून त्याने मद्यप्राशन करून गाडी चालवल्याचे निष्पन्न झाले आहे. यादवला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.