अ‍ॅपशहर

नववर्ष स्वागतयात्रेत वादाचे ढोल

ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या काटेकोर निर्देशांचे सावट यंदा प्रथमच मराठी नववर्ष स्वागतयात्रेवर असल्याने यावेळी बहुतांश ढोल-ताशा पथकांनी स्वागतयात्रेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांची सध्याची भूमिका पाहता स्वागतयात्रेचे आयोजक श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानेही सावध पवित्रा घेतल्याने ढोलताशा पथकांनी या संपूर्ण प्रक्रियेतून एकत्रित बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमावलीमुळे ढोलपथकांचाही उत्साह ओसरल्याने स्वागतयात्रेतील ‘सेवार्थ’ वादनापेक्षा ‘सुपारी’ घेण्याकडे पथकांचा कल वाढू लागला आहे.

Maharashtra Times 24 Mar 2017, 1:13 am
ध्वनिप्रदूषणाच्या नियमावलीमुळे ढोलपथकांचाही उत्साह ओसरला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम restrictions for new year rally
नववर्ष स्वागतयात्रेत वादाचे ढोल

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या काटेकोर निर्देशांचे सावट यंदा प्रथमच मराठी नववर्ष स्वागतयात्रेवर असल्याने यावेळी बहुतांश ढोल-ताशा पथकांनी स्वागतयात्रेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांची सध्याची भूमिका पाहता स्वागतयात्रेचे आयोजक श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानेही सावध पवित्रा घेतल्याने ढोलताशा पथकांनी या संपूर्ण प्रक्रियेतून एकत्रित बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमावलीमुळे ढोलपथकांचाही उत्साह ओसरल्याने स्वागतयात्रेतील ‘सेवार्थ’ वादनापेक्षा ‘सुपारी’ घेण्याकडे पथकांचा कल वाढू लागला आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातून काढल्या जाणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत दरवर्षी विविध ढोल-ताशा पथकांकडून वादन केले जाते. मात्र ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाचे काटेकोर निर्देश असल्याने यंदा धुळवड तसेच शिवजयंती सणांच्या दरम्यान लाऊड स्पीकर, डीजे अथवा ढोल-ताशा वाजवून ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेवर या निर्णयाचे सावट असल्याने आयोजकांनी ढोल-ताशापथकांना यात्रेत सहभागी करून न घेण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. त्यामुळे संतप्त ढोल-ताशा पथकांच्या प्रमुखांनी थेट स्वागतयात्रेकडे पाठ फिरवून ठाण्यातील खासगी स्वागत यात्रेत अथवा मुंबईत वादन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच ‘सेवार्थ’ वादनाच्या नावाखाली आम्ही वादन करतो. मात्र आयोजक म्हणून श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास पथकांच्या पाठीमागे उभे राहत नसेल, तर ढोल-ताशापथक जीवावर उदार होऊन का वादन करतील, असा सवाल शिवरुद्र ढोल-ताशा पथकाचे प्रमुख संतोष शिगवण यांनी ‘मटा’शी बोलताना उपस्थित केला.

राजकीय पक्षांचीही उडी

नववर्ष स्वागत यात्रेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चौकाचौकात ढोल-ताशा पथकांच्या गजरात उत्साहात स्वागत करेल, असे पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना दिलेल्या निवेदनावर त्यांनी पोलिस आयुक्तांना स्वागत यात्रेप्रश्नी सहानुभूतीपूर्वक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

स्वागत यात्रा नियमानुसारच

पोलिसांच्या निर्देशाप्रमाणे स्वागतयात्रेचे आयोजन केले जाणार आहे. तरुणाईच्या कलागुणांना वाव वगैरे मुद्दे ठीक आहेत. मात्र त्यासाठी कायद्याचे उल्लंघन नको. तसेच पोलिसांची आयोजक भेट घेणार असून यातून काही तोडगा काढता येईल का, याबाबत चर्चा केली जाणार आहे.
- सुधाकर वैद्य, विश्वस्त, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज