अ‍ॅपशहर

श्रीकांत शिंदेंविरोधात तगडा उमेदवार मिळेना; ठाकरेंकडून कल्याणसाठी काँग्रेस नेत्याला ऑफर?

कल्याणमधून लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण महाविकास आघाडीला इथे उमेदवार मिळालेला नाही.

| Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2024, 9:33 am
कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराचा शोध कायम आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून त्यामुळे उमेदवार आयात करावा लागण्याची शक्यता आहे. कल्याणसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांच्यासह सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने आता ठाण्यातील केदार दिघे यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार त्यातच भूमिपुत्रांना उमेदवारी देऊन महायुतीची कोंडी करण्याची व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Copy of Rohit sharma (9)


स्थानिक भूमीपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असून केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पहावे लागेल. ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. महायुतीने अद्याप येथील आपला उमेदवार घोषित केलेला नसला तरी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावे प्रचार करण्यास महायुतीने सुरुवात केली आहे. यामुळे शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे चित्र आहे.
राज्यात पुन्हा तिसरी आघाडी? वंचितच्या गोटात वेगवान हालचाली; आंबेडकरांना कोणाकोणाची साथ?
दुसरीकडे शिंदे यांच्यासमोर उमेदवार म्हणून यापूर्वी अनेक नावांची चर्चा रंगली होती. यात वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सर्वात आधी रंगली. मात्र राजकीय आणि त्यातही निवडणुकीच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवापासून नको असे सांगत वरुण सरदेसाई यांनी कल्याण लोकसभेत लढण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याची चर्चा आहे. डोंबिवली हे रश्मी ठाकरे यांचे माहेर आहे. त्यामुळे येथून कौटुंबिक पाठिंबा मिळेल. तसेच रश्मी ठाकरे यांना प्रचारात प्रत्यक्ष उतरवता येईल आणि मतांचे ध्रुवीकरण करता येईल, अशी रणनीती ठाकरे गटाच्या वतीने आखण्यात येत होती. मात्र सरदेसाई यांनी माघार घेतल्याचे बोलले जाते आहे. यानंतर ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे याचे नाव पुढे आले, पण ते पण नाव मागे पडून आता केदार दिघे यांचे नाव चर्चेत आहे.
लोकसभेला एकही सीट नाही, पण अमित ठाकरेंना 'सेट' करणार; भाजपकडून राज यांना नवा प्रस्ताव?
ठाकरे गटाकडून काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना ऑफर
कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. संतोष केणे यांना वारकरी आणि भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याने ही ऑफर दिल्याची आता चर्चा रंगू लागली आहे. याबाबत संतोष केणे यांना विचारले असता ते म्हणाले, मी खऱ्या अर्थाने काँग्रेसकडून इच्छुक आहे. पण कल्याणची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो येथील कार्यकर्त्याला स्वीकारावा लागेल.
राज्यात २३ खासदार; भाजपकडून २२ जागांवर उमेदवार; एका मतदारसंघात अडतंय; काय घडतंय?
कल्याणमध्ये जर भूमिपुत्र उभा राहिला तर येथील संघटनांचा त्यांना पाठिंबा राहील. स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक समस्या असून भूमिपुत्र लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडवू शकतो. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा आग्रह आहे, की मी यात उतरून पाऊल उचलून यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. भूमिपुत्रांना न्याय एक भूमीपुत्रच देऊ शकतो, असे केणे म्हणाले.

महत्वाचे लेख