अ‍ॅपशहर

​ जिवा महालांच्या वंशजांची विदारक अर्थस्थिती

शिवाजी महाराजांच्या जिवाला जीव देऊन रक्षण करणारा जिवा महाला होता. मात्र या जिवा महालाचे तेरावे वंशज सध्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या जगण्याची फरफट झाली आहे. या कुटुंबियांना हात देणारा वालीच नसल्याने सध्या या कुटुंबीयांवर आर्थिक आपत्ती ओढवली आहे. ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटी ही संस्था पंधरावा वंशज प्रतीक सकपाळ (महाले) याच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याने महाले कुटुंबातील जयश्री महाले पहिल्यांदाच ठाण्यात आल्या होत्या.

Maharashtra Times 29 May 2017, 4:00 am
झोपडीतील वास्तव्य, आजारपण, खाण्याची भ्रांत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivaji maharajs aid jiva mahalas family in worst condition
​ जिवा महालांच्या वंशजांची विदारक अर्थस्थिती


पंकज चव्हाण, ठाणे

शिवाजी महाराजांच्या जिवाला जीव देऊन रक्षण करणारा जिवा महाला होता. मात्र या जिवा महालाचे तेरावे वंशज सध्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या जगण्याची फरफट झाली आहे. या कुटुंबियांना हात देणारा वालीच नसल्याने सध्या या कुटुंबीयांवर आर्थिक आपत्ती ओढवली आहे. ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटी ही संस्था पंधरावा वंशज प्रतीक सकपाळ (महाले) याच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याने महाले कुटुंबातील जयश्री महाले पहिल्यांदाच ठाण्यात आल्या होत्या.

महाले कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कोंढवली या ठिकाणी लहानश्या झोपडीवजा मातीच्या घरात राहत आहेत. कुटुंबातील प्रकाश महाले यांना पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाल्याने ते सध्या घरातच झोपून असतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जयश्री यांच्या खांद्यावर असून दोन लेकरांसह अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेले पती यांचा त्या सांभाळ करत आहेत. घरगाडा चालवण्यासाठी जयश्री दुसऱ्याच्या शेतात जाऊन कामे करत कुटुंबाला आर्थिक बळ देत आहेत. प्रकाश हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते, तेव्हा परंपरागत केशकर्तनाचा व्यवसाय करत. तसेच गावकी सांभाळत होते. मात्र अर्धांगवायूमुळे अपंगत्व आल्याने काम करण्यास असमर्थ असल्याने कुटुंबावर आर्थिक आभाळच कोसळले आहे.

या कुटुंबातील प्रतीक हा त्यांचा पंधरावा वंशज असून सध्या तो सातवी इयत्तेत शिकत आहे. आर्थिक आपत्ती ओढावल्याने मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी ठाण्यातील शिक्षण संस्थेने त्यांना बळ दिले आहे. जयश्री या मुलाच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत.

केवळ आश्वासन!

या कुटुंबियांसाठी स्थानिक राजकर्ते अथवा राज्य प्रशासनही मदत करण्यास उदासीन आहे. वर्षातून असंख्य पर्यटक, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी ऐतिहासिक पर्यटक वास्तू म्हणून या घराला भेट देतात. आर्थिक मदत करू म्हणून आश्वासनही देतात. प्रत्यक्षात आम्हाला कोणतीच मदत मिळाली नसल्याचे जयश्री म्हणाल्या.

जिवा महालावर येणार कादंबरी!

सुरत येथे फेब्रुवारी महिन्यात शिवबा या नाटकाचा प्रयोग सुरू होता. हा प्रयोग संपल्यावर काही मंडळी येऊन नाटकांचे लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांना भेटले व त्यांनी जिवा महालावर वेगळं काही करता येईल का, याविषयी विचारणा केली. त्यातूनच आता होता जिवा म्हणून वाचला शिवा, या पलीकडेही जिवा महालाचे कार्यकर्तृत्व कादंबरीच्या रूपाने रसिकांच्या भेटीला येणार आहे. ढवळ यांनी ही कादंबरी लिहिली आहे.

रंगमंचावरही साकारणार

ठाण्यातील लेखक, दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू जिवा महालांच्या जीवनावर नाटक साकारणार आहेत. दिवाळीनंतर या नाटकाची बांधाबांध करण्यात येणार असून या नाटकातून मिळणारी काही रक्कम या कुटुंबाला देण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज