अ‍ॅपशहर

असुविधांमुळे आर्थिक कोंडी

डोक्याला मार लागलेला रुग्ण आणि धास्तावलेले कुटुंब रुग्णालयात आले की डॉक्टरांकडून सिटीस्कॅनचा सल्ला दिला जातो. मात्र रुग्णालयात ही सोयच उपलब्ध नसल्याने थेट खासगी रुग्णालयाचा खर्चिक पर्याय निवडावा लागतो. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या उपलब्ध असणे आणि सरकारी रुग्णालयात मिळणाऱ्या अल्पदरातील सुविधा हे समीकरण कळवा रुग्णालयात फोल ठरत आहे.

Maharashtra Times 12 Nov 2016, 4:00 am
चाचण्यांपासून उपचारापर्यंत सारेच ठरतेय खर्चिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shortage of facilities in hospital
असुविधांमुळे आर्थिक कोंडी


सानिका कुसूरकर, ठाणे

डोक्याला मार लागलेला रुग्ण आणि धास्तावलेले कुटुंब रुग्णालयात आले की डॉक्टरांकडून सिटीस्कॅनचा सल्ला दिला जातो. मात्र रुग्णालयात ही सोयच उपलब्ध नसल्याने थेट खासगी रुग्णालयाचा खर्चिक पर्याय निवडावा लागतो. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या उपलब्ध असणे आणि सरकारी रुग्णालयात मिळणाऱ्या अल्पदरातील सुविधा हे समीकरण कळवा रुग्णालयात फोल ठरत आहे.

दुर्बल आर्थिक घटकातील कुटुंबांना सरकारतर्फे देण्यात येणारी आर्थिक सुविधा म्हणजे सरकारी रुग्णालय. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत निम्म्या दरात हे उपचार होत असल्याने सरकारी रुग्णालयांकडे रुग्णांचा वाढता कल असतो. मात्र याच रुग्णालयातील असुविधांचा फायदा घेणाऱ्यांमुळे रुग्णांची अक्षरशः आर्थिक कोंडी होत आहे. ओपीडीतील तपासणीसाठी अवघ्या १० रुपयांचे शुल्क आकारले जात असले तरी यापुढील उपचारांमध्ये मात्र रुग्णाचे धाबे दणाणते. शासकीय रुग्णालयात सर्व चाचण्या कमी दरात उपलब्ध असणे अपेक्षित असेल तरी रक्तचाचण्यांपासून एमआरआयपर्यंत अनेक चाचण्यांच्या सुविधाच उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते. किडनी आणि लिव्हर या अवयवांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या किमान चाचण्या आवश्यक असतात, मात्र त्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे आयत्यावेळी सांगण्यात येत असल्याने ऐपत नसतानाही हजारो रुपयांचे बिल रुग्णाला भरावे लागते. सोनोग्राफीचे अवघे एक मशिन उपलब्ध असले तरी दुपारी एक वाजेपर्यंत केवळ ओपीडीतील रुग्णांच्या चाचण्या होतात. त्यानंतर केवळ रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचा अजब नियम रुग्णालय प्रशासनाकडून अंमलात आणला जात असल्याने दुपारी एक वाजल्यानंतर आप्तकालीन परिस्थितील रुग्णाला चाचण्यांसाठीही शासकीय रुग्णालयाचा आधार मिळत नाही. अनेकदा रुग्णालय प्रशासनाकडून भुलतज्ज्ञांचा पगारही वेळेवर दिला जात नसल्याने अनेक शस्त्रक्रियांवेळी भुलतज्ज्ञ गैरहजर राहतात आणि त्याचा परिणाम रुग्णाच्या उपचारांवरही होतो.

स्वतःच्या रुग्णालयाचा आग्रह

कळव्यातील अनेक डॉक्टर्स बाहेर स्वतःची खासगी रुग्णालये चालवितात, याबाबतही अनेकदा तक्रारी होऊनही महापालिकेकडून ठोस अशी कारवाई झालेली नाही. मात्र त्याचा थेट परिणाम रुग्णाला देण्यात येणाऱ्या सेवांवर होतो. कळवा रुग्णालयातील चाचण्यांचा तुटवडा लक्षात घेता अनेक डॉक्टर्स रुग्णाच्या कुटुंबांना स्वतःच्या रुग्णालयाचा रस्ता दाखवितात. सरकारी रुग्णालयाची परिस्थिती पाहून धास्तावलेल्या रुग्णाच्या स्थितीचा फायदा घेणाऱ्या या डॉक्टर्समुळे अनेक कुटुंबांना हा खर्चिक पर्यायाला बळी पडावा लागते

अॅम्ब्युलन्सही खर्चिक

कळवा रुग्णालयाकडे दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ही सेवा पुरेशी नाही. एकाचवेळी अनेक रुग्णांना तातडीने ही सेवा हवी असल्यास रुग्णालाच त्याचा खर्च पेलावा लागतो. रुग्णालयात उपलब्ध नसणाऱ्या चाचण्या खासगी रुग्णालयात कराव्या लागत असताना, या हलगर्जी कारभाराची जबाबदारीही रुग्णालयाकडून स्वीकारली जात नाही. अशावेळी रुग्णालयाच्या चुकीचा भुर्दंडही रुग्णाला सोसावा लागतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज