म. टा. वृत्तसेवा, ठाणे
किरकोळ कारणावरून एसटीच्या वाहक आणि चालकाला ट्रकचालकासह चौघांनी मारहाण केल्याची घटना कल्याण-पनवेल रोडवर घडली. यातील एका आरोपीने वाहकाच्या हातातील मशिन वाहकाच्या डोक्यात मारून तोडली असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
एसटीच्या कल्याण डेपोतून ५१ प्रवाशांना घेऊन एसटी बस पनवेलला निघाली होती. कल्याण-पनवेल रोडवरून बस जात असताना दहिसर मोरी येथील एके वजन काट्याच्या येथे बस आली. त्यावेळी उलटा येणारा ट्रक एसटीच्या डाव्या बाजूच्या आरशाला घासला. त्यामुळे एसटी चालकाने बस थांबवली. वाहक विजय शिंगाडे आणि चालक आदिनाथ दराडे बसमधून उतरले आणि ट्रकचालकाला जाब विचारला. या गोष्टीचा राग आल्याने ट्रकचालकाने त्याच्या तीन साथीदारांना त्याठिकाणी बोलावून वाहक आणि चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच तिकीट मशीन हिसकावून ही मशिन वाहकाच्या डोक्यात मारली. मशिनची तोडफोडही केली. वाहकाच्या खिशातील तिकिटांची ३ हजार १३७ रुपयांची रक्कमही आरोपींनी लंपास केली. आरोपीच्या मारहाणीत चालक दराडे यांच्या तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरानंतर वाहक आणि चालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी शिळ-डायघर पोलिस ठाण्यात मोहमद मुस्तफा मो. बशीर खान (६७) ट्रकचालक मो. इम्रान मुस्तफा खान (३७), अब्दुल मुकीम हकिम खान (३५) तसेच त्यांचा एक साथीदार अशा एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.