अ‍ॅपशहर

‘स्वाइन’ संशयाच्या भोवऱ्यात!

पावसाळा, कडक ऊन, पुन्हा पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू फोफावून मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच निदानाच्या सत्यासत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात या आजाराने ५१ जणांचा मृत्यू झाल्याचे विविध रुग्णालयांतील आकडेवारी सांगत असली तरी सरकारच्या संशोधन समितीने केलेल्या चौकशीत यापैकी १७ रुग्णच स्वाइन फ्लू मुळे दगावले असून २९ रुग्णांचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. उर्वरित पाच रुग्णांच्या मृत्यूचे निदान अद्याप या समितीला करता आलेले नाही. मात्र, समितीच्या या अहवालामुळे स्वाइन फ्लू आजारच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Maharashtra Times 9 Sep 2017, 4:00 am
५१ जणांचा मृत्यूची रुग्णालयांत नोंद; संशोधन समिती म्हणते १७
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swine flue deaths in thane
‘स्वाइन’ संशयाच्या भोवऱ्यात!

महेश गायकवाड, ठाणे

पावसाळा, कडक ऊन, पुन्हा पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू फोफावून मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच निदानाच्या सत्यासत्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात या आजाराने ५१ जणांचा मृत्यू झाल्याचे विविध रुग्णालयांतील आकडेवारी सांगत असली तरी सरकारच्या संशोधन समितीने केलेल्या चौकशीत यापैकी १७ रुग्णच स्वाइन फ्लू मुळे दगावले असून २९ रुग्णांचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. उर्वरित पाच रुग्णांच्या मृत्यूचे निदान अद्याप या समितीला करता आलेले नाही. मात्र, समितीच्या या अहवालामुळे स्वाइन फ्लू आजारच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आजाराचे सावट अद्यापही दूर झालेले नाही. ठाणे जिल्ह्यासह पालघर, रायगड जिल्ह्यातही स्वाइन फ्लू बाधित रुग्ण आढळून येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. रुग्णांच्या तपासणीसाठी स्क्रीनिंग सेंटरही सुरू आहेत. औषधांचा मुबलक साठाही उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही विविध रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल होत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे. उपचारांदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बहुसंख्य रुग्णांचा खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेला आहे. मात्र, सरकारी यंत्रणांनी केलेल्या तपासणीअंती यापैकी बहुसंख्य रुग्ण स्वाइन फ्लूने दगावले नसल्याचे सांगितले जात आहे.

समितीच्या बैठका

स्वाइन फ्लूच्या मृत्यूबाबतची चौकशी करण्यासाठी स्वाइन फ्लू मृत्यू संशोधन समिती नेमण्यात आलेली आहे. ठाणे, कल्याण, मिरा भाईंदर, वसई, नवी मुंबई पालिका हद्दीतील तसेच ठाणे ग्रामीण, रायगड आदी भागातील स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची निदान निश्चिती या समितीकडून केली जाते. या समितीत आरोग्य सेवा मुंबई मंडळाच्या ठाणे विभागाच्या उपसंचालक, सहाय्यक संचालक (हिवताप), जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीसह स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर तसेच संबंधित पालिकेची वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली जाते. त्यात रुग्णांवर केलेले उपचार आणि प्रयोगशाळा तपासणी अहवालांची पडताळणी होते. त्यानंतर आजाराचे निश्चित निदान केले जाते. गेल्या दोन महिन्यांत या समितीच्या तीन बैठका झाल्या.

पडताळणीनंतर निदान

८ जुलैच्या बैठकीत २९ रुग्णांच्या मृत्यूचे पडताळणीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. यातील दोन रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे समोर आले. ९ जणांच्या मृत्यूची कारणे वेगळी होती. तर १८ प्रकरणे प्रलंबित होती. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ७ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे निदान करण्यात आले. १३ जणांच्या मृत्यूचे कारण वेगळे होते आणि ९ प्रकरणे प्रलंबित होती. ८ सप्टेंबरच्या बैठकीत तो आकडा ८, ७ आणि ५ असा होता. त्यातून ५० पैकी १७ जण स्वाइन फ्लूमुळे दगावल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज