अ‍ॅपशहर

सिंगापूरचे विमान उडालेच नाही

सिंगापूरमध्ये मुलाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने मुंबईतील एका टॅक्सी चालकाने उसने पैसे घेऊन दोन लाख रुपये भरले. मात्र मुलाला सिंगापूरला पाठवलेच नाही. या टॅक्सीचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 28 Jul 2018, 4:26 am
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील तरुणाची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cheating


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

सिंगापूरमध्ये मुलाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने मुंबईतील एका टॅक्सी चालकाने उसने पैसे घेऊन दोन लाख रुपये भरले. मात्र मुलाला सिंगापूरला पाठवलेच नाही. या टॅक्सीचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅक्सीचालक मुंबईतील नागपाडा परिसरात राहत असून त्यांना दोन मुले आहेत. परदेशात नोकरीसाठी मोठ्या मुलाचे प्रयत्न सुरू आहेत. ओळखीतून त्यांना ठाण्यातील प्लेसमेंट एजन्सीचा नंबर मिळाला. ही एजन्सी मुलांना परदेशात कामासाठी पाठवते. मुलाने प्लेसमेंट एजन्सीला फोन केल्यानंतर समोरील महिलेने ठाण्यातील गांधीनगर येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यामुळे टॅक्सीचालक मुलाला सोबत घेऊन गांधीनगरला आले. येथील स्नेहदीप एंटरप्रायझेसच्या कार्यालयात आल्यांनंतर फ्लोरा उर्फ ऑनिड या महिलेने सिंगापूरला नोकरीसाठी पाठवण्यासाठी साडेतीन लाख रुपये भरण्याबाबत सांगितले. टॅक्सीचालकाकडे इतके पैसे नसल्याने नंतर तीन लाखांत व्यवहार ठरला होता. सिंगापूरमध्ये मॉलमध्ये महिना १ लाख रुपये पगार, राहण्याची सोय आदी आमिष दाखवले होते. मुलाला नोकरी मिळेल या आशेने टॅक्सीचालकाने दोन लाख रुपये भरले होते. मात्र आरोपींनी दिलेला सिंगापूरचा व्हिसा खोटा निघाला. नंतर आरोपींनी सिंगापूरऐवजी दुबईला पाठवतो असे सांगितले. मात्र आरोपी फसवणूक करत असल्याचे टॅक्सीचालकाच्या निदर्शनास आले. मुलाच्या नोकरीसाठी टॅक्सीचालकाने उसने पैसे घेतले होते. ते लोक पैसे परत करण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे टॅक्सीचालकाने फ्लोरा हिच्याकडे पैशाची मागणी केली असता तिने धनादेश दिला. मात्र हा धनादेशही वटला नाही. हा धनादेश फहीम खान याच्या बँक खात्याचा होता.

अशाप्रकारे नोकरी नाही आणि पैसेही देण्यास आरोपींनी नकार दिल्याने अखेर टॅक्सीचालकाने चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यांनतर गुरुवारी फ्लोरा आणि फहीम खान या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज