अ‍ॅपशहर

शिवसेनेने कंटेनरमध्ये थाटली शाखा!

पालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान शिवसेनेची कळव्यातील शाखा जमीनदोस्त केली. त्यानंतर पुन्हा ही शाखा उभारणीचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडले. आता शिवसेनेने चक्क या जागेवर दोन कंटेनर उभे केले असून त्यातून शाखेचा कारभार हाकला जाणार आहे. मात्र या अतिक्रमणाला राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला असून पालिकेने कंटेनर्सचे हे अतिक्रमण हटविले नाही तर भर रस्त्यात कंटेनर उभे करून राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू केले जाईल, असा इशारा आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. त्यामुळे सेनेच्या कंटेनर शाखेचा वाद आता चिघळण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 14 Aug 2017, 12:40 am
वादग्रस्त शाखेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thane shivsena planning to hold shakha in container
शिवसेनेने कंटेनरमध्ये थाटली शाखा!

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

पालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान शिवसेनेची कळव्यातील शाखा जमीनदोस्त केली. त्यानंतर पुन्हा ही शाखा उभारणीचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडले. आता शिवसेनेने चक्क या जागेवर दोन कंटेनर उभे केले असून त्यातून शाखेचा कारभार हाकला जाणार आहे. मात्र या अतिक्रमणाला राष्ट्रवादीने तीव्र विरोध केला असून पालिकेने कंटेनर्सचे हे अतिक्रमण हटविले नाही तर भर रस्त्यात कंटेनर उभे करून राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू केले जाईल, असा इशारा आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. त्यामुळे सेनेच्या कंटेनर शाखेचा वाद आता चिघळण्याची चिन्हे आहेत.

कळव्यातील रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेदरम्यान कळवा नाक्यावरील सेना आणि राष्ट्रवादीची बेकायदा कार्यालये पालिकेने पाडली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शाखेचे बांधकाम पुन्हा सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड आणि स्थानिक नगरसेवकांनी त्याबाबतची तक्रार पालिकेकडे केली होती. मात्र, शाखेच्या बेकायदा बांधकामावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या प्रकरणी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या बांधकामाबाबत कोणती ‘भक्कम’ कारवाई केली, याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ७ जुलै, २०१६ रोजी पालिकेने शाखेचे बांधकाम जमीनदोस्त केले होते. त्या जागेवर पक्के बांधकाम करून शाखा सुरू करण्यास पालिकेकडून परवानगी दिली जात नाहीये. त्यामुळे या जागेवर आता भगव्या रंगाचे दोन कंटेनर्स उभे करण्यात आले असून त्यावर शिवसेनेचा भगवा ध्वजही उभारण्यात आला आहे. शिवसेनेच्या शाखेचे काम या कंटेनर्समधून सुरू केले जाणार असल्याची माहिती स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी दिली.

रस्ता रुंदीकरण मोहिमेत अनेक घरे आणि व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे अनेक दुकानदारांची रोजीरोटी बुडाली. तर, अनेक कुटुंबांचे भाडेतत्त्वावरील घरांमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्यांना पुन्हा बांधकाम करण्याची संधी पालिका देत नसताना शिवसेनेच्या कळव्यातील शाखेलाच वेगळा न्याय का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. ही जागा मोकळी ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानंतरही कंटेनर्स त्या जागी उभे करून न्यायालयाच्या आदेशाचा

अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने या अतिक्रमणाविरोधात कारवाई करून हे कंटेनर्स या जागेवरून तातडीने हलवावेत, अशी मागणी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शिवसेना नेत्यांशी साटेलोटे असल्याने पालिकेने जर कारवाई केली नाही तर राष्ट्रवादीसुद्धा असेच कंटेनर्स रस्त्याच्या मध्यभागी उभे करेल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. त्याशिवाय उच्च न्यायालयात अवमान याचिकासुद्धा दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज