अ‍ॅपशहर

पुन्हा समस्यांचा विळखा

ठाण्यात फेरीवाला धोरणाची कडक अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्याची पालिका प्रशासनाची घोषणा सपशेल हवेत विरली असून फेरीवाल्यांनी पुन्हा स्टेशन परिसरात बस्तान बसवले आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 3:00 am
ठाणे स्टेशनवर फेरीवाल्यांचे बस्तान; रिक्षाचालकही मोकाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thane station surrounded by hawkers
पुन्हा समस्यांचा विळखा


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यात फेरीवाला धोरणाची कडक अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्याची पालिका प्रशासनाची घोषणा सपशेल हवेत विरली असून फेरीवाल्यांनी पुन्हा स्टेशन परिसरात बस्तान बसवले आहे. विशेष म्हणजे रिक्षाचालकांवरही अंकुश ठेवण्याचा वाहतूक प्रशासन व पालिकेचा प्रयत्न फोल ठरला आहे. स्टेशन परिसरात सर्वसामान्यांच्या दुचाकी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागत असले तरी पोलिसांच्या खासगी गाड्या पुन्हा बिनदिक्कत फुकटात जागा अडवू लागल्या आहेत.

ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाले हटवण्याचे काम सुरू असताना १० मे रोजी बेदम मारहाण करण्यात आली होती. पालिकेच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्यापर्यंत फेरीवाल्यांची मजल गेल्याने या कारवाईत थेट आयुक्त संजीव जयस्वाल स्वतः उतरले. त्यांनी फेरीवाला हटाव मोहीम नेटाने राबवण्यापासून रिक्षाचालकांची मुजोरी मोडून काढण्यासाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांच्या या आक्रमकपणावरून काहीजणांकडून टीकेचा सूर उमटला. परंतु जयस्वाल यांनी त्याची पर्वा न करता कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे काही दिवस फेरीवाल्यांसह रिक्षाचालकांना चाप बसला होता.

आता ही कारवाई पुरती थंडावली असून स्टेशन परिसराला पूर्वीसारखा फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. त्यांच्यातून वाट काढताना प्रवाशांच्या नाकीनऊ येत असले तरी प्रशासनाकडून त्याबाबत तोंडदेखल्या कारवाईवर समाधान मानले जात आहे. फेरीवाल्यांची समस्या संपुष्टात यावी, यासाठी फेरीवाला धोरणाची १५ ऑगस्टपासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु सध्यातरी या धोरणाची अंमलबजावणी करणे पालिकेला शक्य झालेले नाही. या धोरणावर अंमलबजावणी होईपर्यंत किमान स्टेशनसारखा प्रचंड वर्दळीचा परिसर पालिका फेरीवालामुक्त ठेऊ शकत नाही का? असा सवाल केला जात आहे.

पुलाखाली पोलिसांच्या दुचाकी

स्टेशन परिसरात आयुक्त जयस्वाल स्वतः कारवाई करत होते, त्यावेळी सॅटिसअंतर्गत पुलाखाली होणारे पोलिसांच्या दुचाकींचे पार्किंग पूर्णपणे थांबले होते. परंतु कारवाईत शैथिल्य येताच आता पुन्हा मोठ्या संख्येने या गाड्या तिथे पार्क असतात. त्यापासून हाकेच्या अंतरावर वाहतूक शाखेचे कार्यालय आहे, सर्वसामान्यांनी वाहन ‘नो पार्किंग’मध्ये पार्क करताच कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलिस या पोलिसांच्या खासगी गाड्यांवर मात्र कारवाई करत नाहीत. शिवाय तिथे लागूनच रेल्वेचा पार्किंग प्लाझा असून तिथे गाडी पार्क करण्यासाठी सर्वांना पैसे मोजावे लागतात. पोलिस मात्र फुकटातच ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाडी पार्क करत असल्याचा विरोधाभास ठाण्यात दिसून येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज