म. टा. वृत्तसेवा, वसई
वसईत धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नसली तरी ती दुभाजकाला आदळल्याने नुकसान झाले आहे.
वसईच्या वसंत नगरी येथे धुळवडीच्या दिवशी सायंकाळी इनोव्हा या चारचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीने रस्त्याच्या दुभाजकावर चढून एका झाडाला टक्कर दिली. सागर शाह असे वाहनचालकाचे नाव असून गाडीत दोन जण होते. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. वाहनचालकाची तपासणी केली असता तो मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे आढळून आले. वाहतूक पोलिसांनी तात्काळ या चालकावर दंडात्मक कारवाई केली. या अपघातामुळे महापालिकेतर्फे दुभाजकावर लावलेल्या चार ते पाच झाडांचे नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.