अ‍ॅपशहर

काटई-कर्जत मार्गावरील वृक्ष संपदा धोक्यात

काटई-कर्जत मार्गाच्या कडेला नानासाहेब धर्माधिकारी यांच्या साधकांनी मेहनत घेत लावलेली वृक्ष संपदा बहरत असून रस्त्याचे सौंदर्य वाढत आहे. मात्र, या मार्गावरील अनेक ठिकाणीही बहरलेली वृक्षसंपदा सध्या संपवण्याचा घाट घातला जात आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 Feb 2021, 6:54 pm
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trees are in the danger on katai karjat way
काटई-कर्जत मार्गावरील वृक्ष संपदा धोक्यात


काटई-कर्जत मार्गाच्या कडेला नानासाहेब धर्माधिकारी यांच्या साधकांनी मेहनत घेत लावलेली वृक्ष संपदा बहरत असून रस्त्याचे सौंदर्य वाढत आहे. मात्र, या मार्गावरील अनेक ठिकाणीही बहरलेली वृक्षसंपदा सध्या संपवण्याचा घाट घातला जात आहे. नेवाळी ते अंबरनाथ टी सर्कल या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्याकडेला अतिक्रमण करत, उभारलेले धाबे आणि किरकोळ साहित्यविक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून जागेसाठी गवत आणि त्यासोबतच अडथळे ठरणारी वृक्ष संपदेला वणवा लावत ती जाळून खाक केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

काटई-कर्जत या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात असून या रस्त्याचा विकास होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा अनेक लहान, मोठे गृहप्रकल्प तसेच ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत. त्या जागांमध्ये विविध लहान, मोठे व्यवसाय, भव्य ढाबे, हॉटेल्स सुरू केले जात आहेत. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात हजारो नागरिक बेरोजगार झाले असून सध्या नोकऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बेरोजगार झालेले अनेक तरुण, कुटुंबे लहान, मोठी साहित्य विक्रीची दुकाने, फळे, भाजीपाला, फळांचा रस तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल सारख्या व्यवसायांकडे वळले आहेत. त्यातूनच काटई-कर्जत महामार्गाला लागून असलेल्या एमआयडीसीच्या जलवाहिन्या आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या जागेचा वापर लहान, मोठे धाबे उभारत फेरीवाल्यांकडून केला जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत काटई-कर्जत महामार्गाच्या दुतर्फा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेच्या साधकांनी रोज अनेक किलोमीटर पायी चालत या वृक्षांना नियमित पाणी घालून त्यांचे संवर्धन केले आहे. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना सावलीचा आधार मिळत असून, रस्त्याचे सौंदर्यही वाढले आहे.

मात्र, या रस्त्याचे व्यावसायिक दृष्ट्या वाढलेले महत्त्व पाहता, या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करत अनधिकृत धाबे, साहित्य विक्रीसाठी लागणाऱ्या जागांसाठी रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांचा बळी घेतला जात आहे. जागा उपलब्ध करताना वाढलेल्या गवताला आग लावणे, झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या मार्गावर गेली अनेक वर्षे संगोपन केलेल्या आणि वाढ झालेल्या वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून निसर्गाची हानी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


हा रस्ता वन विभागाच्या हद्दीबाहेर असून नगरपालिका आणि एमआयडीसीच्या हद्दीत आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत प्रथम कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र वृक्ष जाळण्याचा प्रकाराबाबत तक्रारी आल्यास वन विभागही नगरपालिका आणि एमआयडीसीसोबत संयुक्त कारवाईसाठी वन विभागाकडून संपर्क करण्यास आदेश दिले जातील.

प्रमोद ठाकर, वन क्षेत्रपाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज