अ‍ॅपशहर

अलिशान हॉटेलात विधीमंडळ समितीचा ‘अंदाज’

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही, योजना व्यवस्थित राबवल्या जातात का, याचा अंदाज घेण्यासाठी पनवेलमध्ये मंगळवारी रात्री विधिमंडळ अंदाज समिती दाखल झाली.

Maharashtra Times 1 Feb 2018, 1:47 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vidhan mandal committee at alishan hotel
अलिशान हॉटेलात विधीमंडळ समितीचा ‘अंदाज’


केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतो की नाही, योजना व्यवस्थित राबवल्या जातात का, याचा अंदाज घेण्यासाठी पनवेलमध्ये मंगळवारी रात्री विधिमंडळ अंदाज समिती दाखल झाली. महापालिकेला खूश करण्यासाठी पनवेल महापालिकेने पाहुणचार करण्यासाठी ठरलेल्या जागेत म्हणजेच कळंबोली स्टिल मार्केटमधील देवांशी इन हॉटेला व्यवस्था केली आहे. सिडको, पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी हॉटेलात बसून बैठक घेतली. पनवेल, नवी मुंबई महापालिका आणि सिडको या तीन आस्थापनांची पाहणी करण्यासाठी २९ आमदार असलेली विधीमंडळ अंदाज समिती पनवेलमध्ये आली आहे. मंगळवारी समितीचे पनवेलमध्ये आगमन झाले. पनवेल महापालिकेत मोठे सरकारी विश्रामगृह नसल्यामुळे समिती सदस्यांच्या राहाण्याची व्यवस्था महापालिकेने नेहमी ठरलेल्या देवांशी इन हॉटेलमध्ये केली. विधीमंडळ अंदाज समितीत २९ आमदार असल्यामुळे पनवेल विश्रामगृहात जागा होणार नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष मात्र केवळ आठ आमदार आले आहेत. समितीने बुधवारी सकाळी सिडको, नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका प्रशासनाशी संवाद साधला. या सर्वांची बैठक बाहेर न घेता हॉटेलातील अलिशान हॉलमध्ये ही बैठक झाली. तिन्ही प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना येथे निमंत्रित करण्यात आले होते. खरे पाहता महापालिकेचा पैसा वाचवायचाच असता तर विधीमंडळ समिती महापालिकेच्या फडके नाट्यगृहात, सिडको किंवा नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात किंवा खासगी हॉलमध्ये घेऊ शकली असती, मात्र अंदाज समितीने बाहेर न पडता सर्व अधिकाऱ्यांना 'देवांशी इन हॉटेला'त बोलावून ओळखीचा औपचारिक कार्यक्रम घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पनवेल शहरातील फडके नाट्यगृह आणि एसटीपी प्लान्टची पहाणी करून पुन्हा हॉटेलात जेवण घेण्यासाठी परतले. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर अंदाज समितीचा मोर्चा नवी मुंबई महापालिकेकडे प्रस्थान झाला. समिती येणार म्हणून बुधवारी महापालिकेत एकही विभागातील अधिकारी उपस्थित नव्हते. महापालिका आयुक्त अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात असल्यामुळे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी समितीचे आदरातिथ्य करण्याचे नेतृत्व केले. महापालिकेत अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागले. समितीचा आजचा मुक्काम देखील 'देवांशी इन हॉटेला'त असून गुरुवारी सिडकोचा अंदाज घेतला जाणार आहे.

उपायुक्तांचा बोलण्यास स्पष्ट नकार

विधीमंडळ समितीबाबत विचारण्यासाठी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधला असता याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत बोलणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज