अ‍ॅपशहर

#MataSuperWoman: घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यात पतीचं निधन, हिमतीने उभी राहिली, ४ मुलांचा सांभाळ, आता राजकारणात रॉयल एन्ट्री!

Nandurbar News : आधीच परिस्थिती हलाखीची, त्यातच अल्पभूधारक असल्याने शेतीत राबूनही जेमतेम उदरनिर्वाह होत होता. अचानक पतीचं दुर्दैवी निधन झालं पण, आता जीवनाच्या या संघर्षात रडायचं नाही लढायचं आणि जिंकायचं जणू असा निर्धारच महिलेने केला. नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील वडाळी येथील कल्पनाबाई मोहिते यांनी परिस्थितीवर मात केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2022, 3:52 pm
पतीच्या निधनानंतर काळ्या आईने दिलेला आधारच लाख मोलाचा ठरला आणि चार मुलांची जबाबदारी खांद्यावर घेऊन त्यांचे संसार सुरळीत केले. यामुळेच त्यांचा जीवन प्रवास पंचक्रोशीत अनेकांना थक्क करणारा ठरतोय. यामुळेच की काय कल्पनाबाई आज अनेक महिलांसाठी 'सुपर वुमन' ठरत आहेत. 'चूल आणि मूल' ही संकल्पना आजही ग्रामीण भागात कायम असली, तरी याला फाटा देत आता कल्पनाबाई राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांना गाव विकासाची आस आहे. छत्र हरपलं मात्र धीर सोडला नाही, काळ्या आईने जगायला शिकवलं आणि त्यानंतर राजकारणात देखील ठसा उमटवला. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील वडाळी या छोट्याश्या गावातील ४९ वर्षीय कल्पना बाई मोहिते त्यांचा प्रवास अनेकांसाठी आदर्शवत ठरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nandurbar news women success story after her husband death
#MataSuperWoman: घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यात पतीचं निधन, हिमतीने उभी राहिली, ४ मुलांचा सांभाळ, आता राजकारणात रॉयल एन्ट्री!


पतीच्या निधनानंतर काळ्या आईने दिला आधार

पतीच्या निधनानंतर चार मुलांचा सांभाळ करत कल्पना मोहिते यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. १९८७ साली कल्पना मोहिते यांचं लग्न झालं होतं. २००६ मध्ये पतीचं दुर्दैवी निधन झालं. दु:खाचा डोंगर कोसळला असताना जिद्दीने पुन्हा उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी घेतली. शेतीचा त्यांनी आधार घेऊन मुलांना मोठं केलं. त्यांना उच्च शिक्षण दिलं. त्यांची लग्नही करुन दिली.

...तर आत्महत्येचा विचार येत नाही

स्वबळाच्या जोरावर परिस्थितीवर मात करत अल्पभूधारक असणाऱ्या या महिलेनं आपल्या हिंमतीच्या जोरावर तीन एकर शेती विकत घेतली. भाडे तत्वावर, नफ्याने शेती करून त्यांनी तीन एकर शेती विकत घेतली. आता कल्पना बाई यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्या शेतीत भाजीपाला, केळी, पपई, कापसाचं उत्पादन घेतात. काळ्या आईशी मन लावलं, तर आत्महत्येचा विचार देखील मनात येत नसल्याचं त्या सांगतात.

मुलांना उच्च शिक्षण

हालाखीच्या परिस्थितीत, त्यांनी एकटीने मुला-मुलींचं उच्च शिक्षण तर केलं. पण मुलाला शेती कामाची आवड असल्याने मुलगा देखील कल्पना बाई याना शेती कामात मदत करतो. कल्पना बाई स्वतः दुचाकी वरून शेतावर जातात. स्वतः शेतात कष्ट करून भाजीपाला लावतात आणि मार्केटमध्ये स्वतः त्याची विक्रीही त्या करतात. २००६ मध्ये पतीच्या निधनानंतर वडाळी गावात स्वबळावर उभ्या राहिलेल्या कल्पना बाईंचं काम बघून गावकऱ्यांनी त्यांना राजकारणात येण्याचं सांगितलं.

राजकारणात एण्ट्री

कल्पना बाई यांनी राजकारणात एण्ट्री केली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. राजकीय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी चांगल्या कामाचा ठसा उमटवला. त्या जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. ४ हजार मतं मिळवली, पण ३३७ मतांनी त्यांचा पराभव झाला. कल्पना बाई या सध्या वडाळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे.

सुपर वुमन कल्पनाबाई मोहिते

घरातला कर्ता आणि खंबीर आधार गेल्यानंतर त्यांनी जिद्दीने उभं राहण्याचं ठरवलं. काळ्या शेतीला माय माउली मानणाऱ्या कल्पना यांनी शेतीतून पोटच्या मुलांचा सांभाळ केला. आता त्यांनी राजकारणात ठसा उमटवला आहे. पतीच्या निधनानंतर जिद्द, चिकाटीने आणि काळा आईच्या आधाराने मेहनतीच्या बळावर अनेकांसाठी आदर्शवत ठरणाऱ्या सुपर वुमन कल्पनाबाई मोहिते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

महत्वाचे लेख