अ‍ॅपशहर

टॉनिक मैत्रीचं

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या आम्ही सर्व सासुरवाशिणी साधारण १९८० च्या सुमारास लेकुरवाळ्या झालो. शिवाजी पार्कच्या बागेत खेळणारी आमची मुलं पुढे शाळासोबती झाली आणि त्यातूनच उलगडत गेला आमच्या मैत्रीचा पट.

Maharashtra Times 21 Feb 2017, 12:44 am
जयश्री धर्माधिकारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम feiendship tonic
टॉनिक मैत्रीचं


दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या आम्ही सर्व सासुरवाशिणी साधारण १९८० च्या सुमारास लेकुरवाळ्या झालो. शिवाजी पार्कच्या बागेत खेळणारी आमची मुलं पुढे शाळासोबती झाली आणि त्यातूनच उलगडत गेला आमच्या मैत्रीचा पट.
त्यावेळी संध्याकाळी ६ ते ८ चा वेळ म्हणजे आमच्या आयुष्याचा विश्रांतीचा कट्टा होता. सुखदु:खाची देवाण-घेवाण, अडीअडचणीत एकमेकींना केलेली मदत, विरंगुळा म्हणून मुलांना घेऊन केलेल्या छोट्याशा सहली, या सर्वांमधून मैत्रीची वीण घट्ट विणली गेली. कालांतराने मुलांच्या शाळा संपल्या. मग त्यांचं कॉलेजचं शिक्षण, लग्नकार्ये, त्यांची बाळंतपण करताना सर्वजणी पत्नी, सून, आई, सासू या जबाबदाऱ्यांमधून मोकळ्या झालो. आता संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे संपवून पुन्हा एकदा 'कट्टा मैत्रिणी' झालो. आयुष्याच्या त्याच ओढीने आता परत या निवांत संध्याछायेत रोजचे संध्याकाळचे दोन तास हे आमचे टॉनिक आहे. या संध्याकाळची रोज आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. अगदी राजकारणापासून स्वयंपाक घरापर्यंत, अमेरिका –युरोपच्या प्रेक्षणीय स्थळांपासून आमच्या लाडक्या मुंबईच्या गल्लीबोळापर्यंत सर्व विषयांवर या दोन तासात मनमुराद फिरून येतो. पूर्वी बस आणि ट्रेनने फिरणाऱ्या आम्ही आता टॅक्सीत बसतो आणि भटकण्याचा, खाण्यापिण्याचा, मौजमजेचा निखळ आनंद मनापासून उपभोगतो.
मध्यंतरी आमच्या आजारी मैत्रीणींना त्यातून बाहेर काढण्यासाठी, तसंच दु:खाचा डोंगर कोसळलेल्या मैत्रिणीला मानसिक आधार देण्यासाठी सर्वजणी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभ्या राहिलो. परत एकदा सर्वांची व्यवास्थित मोट बांधली. खरंच आमची निखळ मैत्री नात्यापेक्षासुद्धा मोठी आहे. कट्ट्यावरची रोजची भेट आम्हाला मनमुराद हसण्याची, थट्टामस्करी करण्याची, दु:ख हलकं करण्याची, आनंद द्विगुणित करण्याची हक्काची जागा मिळवून देते. मला वाटतं की जशा आयुष्याच्या जोडीदाराच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात तशा आमच्या या मैत्रीच्या गाठीसुद्धा बांधल्या जाणं हा दैवी योगच असावा. म्हणूनच सासरच्या उन्हात माहेरची सावली मिळाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज