अ‍ॅपशहर

खऱ्या जगाची ओळख

ऑफिस आणि घरातील दैनंदिन कामं सुरळीतपणे पार पडल्यावर, मोकळ्या वेळेत मनापासून आवडणारा विरंगुळा म्हणून वाचन हा माझा सर्वात आवडता छंद आहे. लहानपणी मी चार-पाच वर्षांची असताना लिहण्या-वाचण्याची अक्षर ओळख होताच आईने मला ग्रंथालयातील बाल-विभागाचे सदस्यत्व घेऊन दिले. मला अजूनही आठवतं आई बरोबर ग्रंथालयात गेल्यावर तिथल्या वयस्कर ग्रंथपाल आजी मला बाल-साहित्याशी संबंधित बरीच पुस्तकं आपुलकीने दाखवत.

Maharashtra Times 17 Feb 2017, 12:42 am
रीना महिंद्रकर, वाळकेश्वर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hooby for life
खऱ्या जगाची ओळख

ऑफिस आणि घरातील दैनंदिन कामं सुरळीतपणे पार पडल्यावर, मोकळ्या वेळेत मनापासून आवडणारा विरंगुळा म्हणून वाचन हा माझा सर्वात आवडता छंद आहे. लहानपणी मी चार-पाच वर्षांची असताना लिहण्या-वाचण्याची अक्षर ओळख होताच आईने मला ग्रंथालयातील बाल-विभागाचे सदस्यत्व घेऊन दिले. मला अजूनही आठवतं आई बरोबर ग्रंथालयात गेल्यावर तिथल्या वयस्कर ग्रंथपाल आजी मला बाल-साहित्याशी संबंधित बरीच पुस्तकं आपुलकीने दाखवत.
शाळेत पहिलीत असताना मला पहिलं बक्षिस पुस्तक-रूपात मिळालं त्याचं नाव होतं ‘भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू’. ते पुस्तक मी बरीच वर्ष जपून ठेवलं होतं. चांदोबा, जादूचा दिवासारख्या पुस्तकांपासून मजल-दरमजल करत आता वृत्तपत्रातील बातम्या, आत्मचरित्र, अनुवादित साहित्य, प्रवास-वर्णन आणि इतिहास हे माझ्या आवडीचे विषय आहेत. मनाला वेढून राहणाऱ्या या छंदामुळे दिवाळी सणात फराळ, उटणं आणि रोषणाई सोबत दिवाळी अंकांचे वेध लागतात. एखादं पुस्तक आवडल्यावर परत वाचण्याचा मोह मला आवरता येत नाही. प्रत्येक आवडलेल्या पुस्तकाची माझ्या कुटुंबियांसोबत विस्तृत चर्चा करणं हा माझ्यासाठी बौद्धिक आनंदाचा विषय असतो. मला या छंदासाठी कुटुंबियांकडून तसंच पूर्वी बदलापूरमध्ये वास्तव्यास असताना तेथील लोकप्रिय वाचनालय 'ग्रंथसखा' आणि सध्याचे 'मलबार हिल कला केंद्र' वाचनालयाकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळालं.
इंटरनेटवर ऑनलाइन वाचण्यापेक्षा कोऱ्या-करकरीत कागदाचा वास आणि त्यातील गुळगुळीत पानं असलेलं पुस्तक आणि वृत्तपत्र प्रत्यक्ष वाचण्यात मला खरा आनंद वाटतो. आयुष्याकडे डोळसपणे पहायला शिकवणारा हा सर्जनशील छंद तटस्थपणे जगाच्या खऱ्या रूपाचं दर्शन घडवतो. वाचनात रमून गेल्यावर अक्षरांमागे लपलेली अद्भुत सृष्टी आणि त्यातील हर्ष, मनाला जाणवणारी संवेदना कायमच मला या छंदाकडे खुणावत राहणार.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज