अ‍ॅपशहर

लाडक्या बाबांसाठी खास गीत

माझे 'बाबा आहेत' हे म्हणण्यात जेवढा आनंद असतो तो 'बाबा होते' असं म्हणण्यात नाही. आज माझ्या बाबांना गाण्याच्या रुपात साकार करण्याची संधी साधणार आहे. मी बाबांची खूप लाडकी होते. पण वडील म्हटलं की दरारा हा असतोच. हो, त्यांचा दरारा होता पण तो आदरयुक्त होता. त्यात माया, प्रेम होतं. माझ्या वडिलांचं निधन त्यांच्या ५२व्या वर्षी झालं.

Maharashtra Times 16 Jan 2017, 12:50 am
>> शीला कोकणे-बारटक्के, चेंबूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम favourite song
लाडक्या बाबांसाठी खास गीत


माझे 'बाबा आहेत' हे म्हणण्यात जेवढा आनंद असतो तो 'बाबा होते' असं म्हणण्यात नाही. आज माझ्या बाबांना गाण्याच्या रुपात साकार करण्याची संधी साधणार आहे. मी बाबांची खूप लाडकी होते. पण वडील म्हटलं की दरारा हा असतोच. हो, त्यांचा दरारा होता पण तो आदरयुक्त होता. त्यात माया, प्रेम होतं. माझ्या वडिलांचं निधन त्यांच्या ५२व्या वर्षी झालं. त्यामुळे त्यांचा सहवास अजूनही अपुरा वाटतो. त्यांना त्यांच्या आई-वडिलांचं छत्र अल्पकाळ मिळालं. त्यातूनही त्यांनी स्कॉलरशिपवर उच्च शिक्षण घेतलं. ते अतिशय बुध्दिमान होते. अल्पकाळासाठी नोकरी करुन स्वबळावर स्वत:चा व्यवसाय सुरु केला. व्यवसायातील चढ-उतारांना तोंड दिलं. तुटपुंज्या कमाईतही त्यांनी नातेवाईकांना खूप आधार दिला. पण ते गेल्यानंतर नातेवाईकांकडून मात्र आम्हाला आधार मिळाला नाही. त्यांना खंबीरपणे साथ दिली ती माझ्या आईने. आजही ती खंबीरपणे उभी आहे. व्यवसायाचा जम बसायला सुरुवात झाली. सुखाच्या एक-एक विटा जमवून, त्याभोवती आधाराच्या भिंती उभ्या केल्या. त्यावर मायेचं छप्पर टाकून त्यांनी लोणावळा येथे छोटंसं टुमदार घर घेतलं. काही वर्षातच त्यांनी खूप मोठी झेप घेतली. एके दिवशी त्यांच्या आजारपणाने त्यांना जगातून हिरावून नेलं. आम्ही पोरके झालो. या छोट्या वेलीला मिळालेला आधार बघायला ते नव्हते. त्यांनी वर्तवलेल्या इच्छेप्रमाणे मला उत्तम स्थळ मिळालं. आज मला जे ऐश्वर्य मिळालं आहे, ते त्यांच्या आशीर्वादानेच. उत्तम बंगला, घराभोवती बगिचा आणि बगिच्यातील दोन नारळाची झाडं. ती पाहिली की, मला लता मंगेशकरांच्या या गाण्याची आठवण होते. हे हृदयस्पर्शी गाणं मी कधीही विसरु शकणार नाही. त्या गाण्यातील काही ओळी खालीलप्रमाणे-

कल्पवृक्ष कन्येसाठी,
लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला,
याल का हो बघायाला...
तुम्ही गेला आणिक,
तुमच्या देवपण नावा आले
सप्‍तस्वर्ग चालत येता,
थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले,
तीर्थक्षेत्र काशी झाले !
तुम्हावीण शोभा नाही,
वैभवाच्या देऊळाला…
सूर्य-चंद्र तुमचे डोळे,
दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही,
कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची,
पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात,
या हो बाबा एकच वेळा…

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज