अ‍ॅपशहर

रखुमाईची व्यथा

माझ्या मनातलं गाणं आहे, विठूराय आणि रखमाईचं. भक्तांच्या व्यथा मांडणारी अनेक गीते आहेत पण देवाची व्यथा मांडणारं गीत क्वचितच आढळेल.

Maharashtra Times 15 Jul 2016, 3:30 am
दीपा कुलकर्णी, बोरिवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम favourite song pandharinatha zadakari ata
रखुमाईची व्यथा


माझ्या मनातलं गाणं आहे, विठूराय आणि रखमाईचं. भक्तांच्या व्यथा मांडणारी अनेक गीते आहेत पण देवाची व्यथा मांडणारं गीत क्वचितच आढळेल. पी. सावळारामांचे शब्द, वसंत प्रभू यांचे संगीत आणि आशा भोसलेंचा दैवी आवाज या गीताला लाभला आहे. अत्यंत समर्पक शब्दांत गीतकाराने भक्तीच्या बाजारावर भाष्य केलं आहे. मनाला भिडणारे शब्द आणि संगीत आशाताईनी आपल्या आवाजाने जणू जिवंत केले आहे.
पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडुन चला
विनविते रखुमाई विठ्ठला
ज्ञानदेवें रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण, प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी , गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा , रहायचे मग इथे कशाला
भक्तांच्या उद्धारासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला रख़ुमाई म्हणते ‘हे प्रभो, संतांच्या भक्तिखातर आणि भक्तांच्या उद्धारासाठी आपण भूतलावर आलो. पण आता ते संतही नाहीत आणि भेटीला आलेले गरीब भक्तही मंदिराच्या पायरीपाशीच अडवले जातात. पैशाचे माजलेले स्तोम आणि धर्माचा बाजार, आपल्या देवपणाचा चाललेला विक्रय हे सर्व मला सहन होत नाही. आता इथे थांबणे व्यर्थ आहे. त्यामुळे या ठिकाणाहुन आपण त्वरीत निघावे किंवा मला तरी निरोप द्यावा.’
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरीजनमेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला
आज आपण कोणत्याही लहान मोठ्या तीर्थक्षेत्राला गेलो असता या गीताचे बोल किती खरे आहेत, हे जाणवतं. आज मंदिरांवरून चाललेलं राजकारण पाहता मनात प्रश्न पडतो की ‘खरंच, अजूनही देव मंदिरात थांबला असेल का?’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज