अ‍ॅपशहर

सहकाऱ्यांनी वाचवलं!

आयुष्यात येणारे काही क्षण नेहमीच परीक्षा घेणारे असतात. कधी ते जिवावर आघात करणारे असतात तर कधी आपली आर्थिक नाडी असलेल्या नोकरीलाच धोक्यात आणणारे असतात. १९८३ साली स्टेट बँकेच्या माहीम शाखेत मी कार्यरत असताना घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगतो.

Maharashtra Times 19 Apr 2018, 11:53 am
सूर्यकांत भोसले, मुलुंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save-life


आयुष्यात येणारे काही क्षण नेहमीच परीक्षा घेणारे असतात. कधी ते जिवावर आघात करणारे असतात तर कधी आपली आर्थिक नाडी असलेल्या नोकरीलाच धोक्यात आणणारे असतात. १९८३ साली स्टेट बँकेच्या माहीम शाखेत मी कार्यरत असताना घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगतो. जॉइंट कस्टोडियन या नात्यानं तिजोरीच्या चाव्यांचा एक जुडगा माझ्या ताब्यात होता. बँकेत असताना, प्रवास करताना व घरी गेल्यावर देखील या चाव्या कस्टोडियनपासून एकही क्षण अलग होता कामा नये अशी ताकीदच बँकेने दिलेली असते. तो दिवाळीचा दुसरा दिवस होता. पैसे काढणाऱ्या ग्राहकांची नऊ वाजल्यापासून गर्दी होणार म्हणून सकाळी सात वाजताच मी घर सोडलं. दुसरे जॉइंट कस्टोडियन सुभाष चिटणीस वाट पाहत होते. तिजोरी उघडण्यासाठी चावी काढावी म्हणून बॅग उघडली आणि काय चावीच सापडेना. दरदरुन घाम आला, काय करावं तेच कळेना.

घरी परत जाऊन येईपर्यंत आणखी कमीत कमी दोन तास लागणार होते. हीच ती वेळ कुणीतरी पुढे येऊन समयसूचकता दाखवण्याची. सुभाष चिटणीस, शशिकांत सावंत, दिलीप अजिंक्य, सुधीर रेगे, सुहास विजयकर, प्रताप राणे, चिंदरकर, शोभा प्रधान, उदय तेंडूलकर, जयश्री चिटणीस, शुभांगी पेडणेकर, सुहास गायतोंडे, बाला सुब्रमण्यम, मंदा बांदिवडेकर हे सारे माझ्या पाठीशी देवासारखे उभे राहिले. रोज बँकेत पैसे भरणाऱ्या दुकानदारांकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांची रोकड बँकेत घेऊन आले आणि त्यातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांची सोय केली.

मी परत घरी जायला निघालो. पोहचेपर्यंत माझी अवस्था एखाद्या गुन्हेगारासारखी झाली होती. चावी हरवली तर नोकरीही गेली. तीन लहान मुलं, पुढे काय? भीतभीत घरी पाऊल ठेवताच पत्नीच्या हातात चावी दिसली व स्वर्ग पाहिल्याचा आनंद झाला. मी घरातून निघून गेल्यानंतर माझ्या एक वर्षाच्या मुलाच्या हातात तो चाव्यांचा जुडगा तिनं पाहिला. मी निघण्याची तयारी करत असताना माझं दुर्लक्ष झालं असावं व जेवणाचा डबा ठेवण्यासाठी उघडलेल्या बागेतील चावी त्यानं काढली असावी, असा मी अंदाज बांधला. मी उभ्यानेच माघारी परतलो. अकरा वाजता बँकेत पोहोचलो तेव्हा ग्राहकांची तुडुंब गर्दी होती. मात्र पुढील तासाभरात सारं काही सुरळीत झालं. माझ्या या कसोटीच्या क्षणी मला धीर देणारे सहकारी व मला समजून घेणारे ग्राहक या सर्वांचा मी त्या क्षणापासून कायमचा ऋणी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज