अ‍ॅपशहर

...आणि बॅग मिळाली

डिसेंबर २०१४ रोजी मी जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाऊन आलो. मी व्यवसायाने प्राध्यापक असलो तरी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसामान्यच आहे. त्यामुळे वर्षाच्या आत पुन्हा आंतरराष्ट्रीय परिषदेत जाणं माझ्या स्वप्नात नव्हतं. माझ्या मित्राच्या ओळखीवरून रोम येथे राहण्याचा प्रश्न मिटला.

Maharashtra Times 23 Sep 2016, 12:45 am
>> डॉ. सुभाष डिसोजा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kshan kasotiche
...आणि बॅग मिळाली


डिसेंबर २०१४ रोजी मी जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाऊन आलो. मी व्यवसायाने प्राध्यापक असलो तरी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसामान्यच आहे. त्यामुळे वर्षाच्या आत पुन्हा आंतरराष्ट्रीय परिषदेत जाणं माझ्या स्वप्नात नव्हतं. माझ्या मित्राच्या ओळखीवरून रोम येथे राहण्याचा प्रश्न मिटला. अखेर १६ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री मी निघालो आणि रोम येथील फ्युमिसिनो विमानतळावर १७ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता पोहोचलो. ज्या ठिकाणी विमानातील आपल्या बॅगा सुपूर्त केल्या जातात तिथं दोन तास थांबूनही माझी​ बॅग सापडेना. त्या बॅगमध्ये माझे कपडे, कागदपत्रं, पैसे आणि इतर महत्त्वाचं साहित्य होतं. विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माझा पत्ता घेतला आणि बॅग सापडल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवू असं सांगितलं.

परिषद सोमवारी सुरु होणार होती. माझी मनःस्थिती तेथील इटालियन धर्मगुरूंनी हेरली. रविवराच्या धार्मिक विधीला जाण्यासाठी त्यांनी मला त्यांचे कपडे दिले. आश्चर्याची बाब म्हणजे आमच्या दोघांची शारिरीक ठेवण सारखीच होती. रविवारी सकाळी व्हॅटीकनला पोहोचलो आणि मला अगदी मोक्याची जागा मिळाली. व्हॅटीकन सिटीतील ते प्रचंड ग्राऊंड जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लक्षावधी श्रद्धावंतांनी खचाखच भरुन गेलं होतं. पावित्र्याचे आणि मांगल्याचे वारे वाहत असल्याची अनुभूती येत होती. सेंट पीटर्स चर्चचा देखावा डोळ्याचे पारणे फिटीत होता. प्रचंड समुदाय उपस्थित असूनसुद्धा अत्यंत प्रार्थनामय वातावरण होतं. हे नेत्रदिपक दृश्य मी डोळ्यात साठवत होतो. माझ्या आयुष्यातील तो अवर्णनीय क्षण होता. दुसऱ्या बाजूला धाकधूक होती. अस्वस्थ अवस्थेत वैचारिक गोंधळात मी खोलीवर परतलो. रविवारी रात्री ९.०० ची वेळ. जोरात पाऊस सुरु झाला. इतक्यात दाराची बेल वाजली. माझी बॅग घेऊन विमानतळावरील अधिकारी आले होते. त्याक्षणी झालेला आनंद तो काय वर्णावा. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटू लागले. दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय परिषदेत केवळ शोधनिबंधच सादर केला नाही तर एका सत्राचे अध्यक्षस्थानही भूषवलं. परदेशातील अनेक प्राध्यापकांशी ओळख झाली. या अनुभवाने भविष्यात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची ज्योत माझ्या मनात प्रज्वलित झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज