अ‍ॅपशहर

मंगळसूत्राची गोष्ट

लग्नाला आठ दिवस राहिले होते. मी त्याच्याकडे गेलो. दोन-तीन हेलपाटे मारल्यावर तो पैसे द्यायला टाळाटाळ करतो हे लक्षात आलं. ती त्याचे पैसे परत करेन याची त्याला खात्री वाटेना. मैत्रीच्या आड व्यवहार आला.

Maharashtra Times 23 May 2017, 3:00 am
सदतीस एक वर्षांपूर्वीची घटना आणि त्याची आठवण होण्याचं निमित्त झालं माझ्या मुलानं त्याचं ठरवलेलं लग्न. त्याकाळी नोंदणीपद्धतीने लग्न, मानपान, देणे-घेणे, आहेर या गोष्टींना फाटा द्यायचा आणि लग्न खर्च निम्मा वाटून घ्यायचा या गोष्टी अगदी अपवादात्मक असायच्या. या गोष्टी माझ्या घरच्यांना पसंत नव्हत्या. त्यामुळे आम्ही आमच्या पैशांनीच लग्न करायचं ठरवलं. माझ्याजवळ तसे फारसे पैसे नव्हते; पण काही मित्रांनी उसने पैसे द्यायचे कबूल केले. एक अपवाद वगळता सर्वांनी कबूल केल्याप्रमाणे पैसे दिले. त्यामुळे कार्यालय भाडं, केटर इत्यादी सर्व माझ्या वाटणीचे पैसे दिले. एकच गोष्ट राहिली आणि ती म्हणजे मुक्ताला, माझ्या पत्नीला माझ्याकडून हवं असलेलं मंगळसूत्र. त्यासाठी एका राहिलेल्या मित्राकडून पैसे आले, की आणायचं असं ठरवलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marriage money mangalsutra
मंगळसूत्राची गोष्ट

लग्नाला आठ दिवस राहिले होते. मी त्याच्याकडे गेलो. दोन-तीन हेलपाटे मारल्यावर तो पैसे द्यायला टाळाटाळ करतो हे लक्षात आलं. ती त्याचे पैसे परत करेन याची त्याला खात्री वाटेना. मैत्रीच्या आड व्यवहार आला. माझ्यावर असलेला त्याचा अविश्वास यामुळे मी अस्वस्थ झालो. आयुष्यातून एखादा मित्र ‘‌‌डिलिट’ करण्याच्या वेदना खूप काळ त्रास देतात. मैत्रीचे बंध तोडून मी बाहेर पडलो. अशा क्षणी मला खात्रीचा आधार वाटेल अशा मित्राची आठवण झाली. वास्तविक त्यानं कबूल केल्याप्रमाणे त्याचा वाटा दिला होता; पण आता वेळ थोडा होता. तो मित्र होता ‘कॉन्टिनेंटल प्रकाशन’चा रत्नाकर कुलकर्णी.
कॉलेजपासून नोकरी लागेपर्यंत मी आणि रत्नाकर त्यांच्या ‘योगक्षेत्र’ बिल्डिंगमध्ये एकत्र राहत होतो. माझ्या मैत्रीचं हक्काचं घर होतं. मी ‘कॉन्टिनेंटल’मध्ये गेलो, तर रत्नाकर प्रकाशनाच्या कामासाठी नागपूरला गेला होता. दोन दिवसांनी येणार होता. मी परत दोन दिवसांनी गेलो; पण त्याचा मुक्काम लांबला होता. मी परत दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी येतो असा ‌निरोप अनिरुद्धनं दिला. आता मात्र माझे हात-पाय गळाले. अनिरुद्ध, मॅनेजर मामा घोले, शंकरभाऊ खत्री अशा सर्वांनी माझ्याशी लग्नावरून चेष्टामस्करी चालू केली. माझं मात्र कशातच लक्ष नव्हतं. मला माझ्या हतबलतेची तीव्र जाणीव झाली. अगदी ‘कसोटीचा क्षण’ होता.
खाली दुकानात चाललेला आवाज ऐकून स्वतः अनंतराव खाली आले. माझ्या पाठीवर थाप टाकून तुझा मित्र आला नाही, तरी मी आणि सुवर्णा (रत्नाकरची पत्नी) आम्ही नक्की येतो. नेहमीप्रमाणे अनंतरावांनी एक डोळा बारीक करून माझ्याकडे पाहिलं. मी जड पावलांनी निघालो. दरवाज्यांपर्यंत गेलो आणि बाबांनी (अनंतरावांनी) हाक मारली आणि म्हणाले, ‘अनिरुद्ध, हा त्याच्या मित्रासाठी सारख्या चकरा मारतो. तुमच्या लक्षात आलं नाही का, की त्याची काही अडचण आहे. ड्रॉव्हर उघड आणि सरदारला (अनंतराव मला ‘सरदार’ या नावाने हाक मारीत) तीन हजार रुपये दे आणि चिठ्ठी माझ्या नावानं टाक.’ खरं तर, मला दीड हजारांचीच गरज होती आणि मी तसं बाबांना म्हणालोही. तेव्हा ‘आयत्या वेळी काही अडचण आली, तर असू देत. नाही लागले तर नंतर परत कर,’ असं त्यांनी सांगितलं.
माझ्या भावना दाबून मी बाबांसमोर उभा होतो. पाठीवर अनंतरावांचा धीराचा हात होता. कसोटीच्या क्षणी मित्रावरची जबाबदारी त्याच्या वडिलांनी निभावली. आता बाबा नाहीत. रत्नाकरही त्याचं दुखणं माझ्यापासून लपवून ,न सांगता निघून गेला. मागं शिल्लक राहिलं, ते ‘कॉन्टिनेंटल’शी असलेलं घट्ट नातं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज