अ‍ॅपशहर

छातीएवढं पाणी भरलं अन्...

माझं सगळंच आयुष्य कसोटीच्या क्षणांनी भरलेलं होतं, त्यातलाच हा एक. साधारण १९९० साली ग्रँट रोड येथे माझ्या मुलीच्या नणंदेचा साखरपुडा संध्याकाळी होता. त्यासाठी दुपारी दोन वाजता मी माझे, पती आणि चार वर्षांची नात असे डोंबिवलीहून निघालो.

Maharashtra Times 18 Oct 2016, 12:13 am
पुष्पा करंबेळकर, जैसलमेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pushpa karambelkar shared her experince
छातीएवढं पाणी भरलं अन्...

माझं सगळंच आयुष्य कसोटीच्या क्षणांनी भरलेलं होतं, त्यातलाच हा एक. साधारण १९९० साली ग्रँट रोड येथे माझ्या मुलीच्या नणंदेचा साखरपुडा संध्याकाळी होता. त्यासाठी दुपारी दोन वाजता मी माझे, पती आणि चार वर्षांची नात असे डोंबिवलीहून निघालो. पावसाला नुकतीच सुरुवात झालेली. गाड्या नीट आहेत ना? याची चौकशी करुन आम्ही लोकलमध्ये चढलो. ठाण्यापर्यंत गाडीबरोबर आली. पुढे पाऊस सुरु झाला. घाटकोपरपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कुर्ल्याच्या काही भागात पाणी भरलं होतं. पुढे पाणीच पाणी त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवणं अशक्य झालं. त्याने सायन प्लॅटफॉर्मना गाडी कशीतरी आणून उभी केली. संपूर्ण प्लॅटफॉर्म पाण्याने तुडुंब भरलेला. गाडीतही पाणी आलं. आम्ही कसेतरी सायन स्टेशनबाहेर आलो.
समोर पाण्याचा समुद्र पसरलेला. वाट सापडत नव्हती. पाच-सहा माणसं गुडघ्याभर पाण्यातून चाललेली. आता काय करायचं? शेवटी आम्ही माटुंगा पूलाजवळ आमचे मित्र राहत होते, तिथं जायचं ठरवलं. पण जायचं कसं? पाण्यातून वाट काढता येत नव्हती. बरोबर छोटी नात. तेवढ्यात मागून एक तरुण माणूस आला. त्याने आमच्या नातीला खांद्यावर घेतलं आणि माझा हात धरुन आजोबांना म्हणाला, ‘चला पूलावरून जायचं आहे ना? मीही तिकडंच जातो आहे’. त्याच्या मदतीने आम्ही कसेबसे पूलाजवळ आलो. वर चढायचं तर छातीएवढं पाणी. तोपर्यंत समोरून आणखी एक माणूस आला. त्याने आणि पहिल्या माणसाने आम्हाला पूलावर ओढून घेतलं. आम्ही माटुंगा स्टेशनजवळच्या मोदी निवासमध्ये आलो. तोपर्यंत रात्रीचा १ वाजला होता. आमचे मित्र झोपलेले. त्यांना उठवून आम्ही घडलेला सर्व प्रकार सांगितला. आम्ही घरात पोहोचल्यावर मदत करणार इसम गेला. त्याचे पण नातेवाईक तिथं जवळपासच होते. पुढे जोरदार पावसामुळे लोकल ३ दिवस बंद होत्या आणि आम्ही ९ तारखेच्या साखरपुड्याला निघालेलो, १२ तारखेला संध्याकाळी घरी आलो. आम्ही निदान मित्राकडे तरी होतो. असे अनेक लोक प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. अनपेक्षित आलेल्या संकटाने आम्हाला मदत करणाऱ्या त्या देवमाणसाचं नावगाव विचारणं राहूनच गेलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज