अ‍ॅपशहर

सख्खे शेजारी

वहिनींप्रमाणेच त्यांचा मुलगा, सून मदतीला सदैव तत्पर. त्यांचे सर्व नातेवाईकही अगत्यशील आहेत. काकांची प्रकृती आता तितकी ठीक नसते.

Maharashtra Times 20 May 2017, 3:00 am
माझे पती मुंबईला स्टेट बँकेत नोकरीला होते. त्यांना निवृत्त व्हायला एकच वर्ष राहिलं होतं. मुलगा पुण्याला कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. पुण्याला नोकरीची संधी होता म्हणून आम्ही धुळ्याला असलेला बंगला विकून पुण्यात फ्लॅट घेतला. पुण्याला स्थायिक होणार म्हणताच त्यांच्या एका मित्रानं कळवलं, पुण्यात राहा; पण पुणेकर होऊ नकोस. त्यामुळे पुणेकरांचा धसकाच घेतला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neighbors dhule pune
सख्खे शेजारी

शेजारी गद्रे कुटुंबाचा ब्लॉक होता. गद्रे काका टेल्कोत सर्व्हिसला होते. ते सांगलीचे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. आम्ही आल्यावर ते राहायला आले. वहिनी मात्र पुणेकर. त्यातून सदाशिव पेठी आणि त्यांचे सर्व नातेवाईक इथेच. त्यामुळे कसे असतील लोक, ही धास्तीच होती. आमचे सर्व गैरसमज दूर केले, विनयाताईंनी (वहिनींनी). एकत्र कुटुंबातल्या असल्यामुळे त्यांना माणसांची ओढ होती. त्यांच्याकडे नातेवाईक, मैत्रिणींचा सतत राबता असायचा. आमच्याकडे आमच्या सासूबाई, नणंद, आम्ही दोघं, नुकतंच लग्न झालेले मुलगा आणि सून. या साऱ्यांना वैचारिकदृष्ट्या आणि प्रेमानं एकत्र बांधून ठेवण्यात माझी कसरत असायची. कधी कधी मानसिक ओढताण व्हायची. मग ती वहिनीजवळ बोलायचे. त्या माझ्यापेक्षा कितीतरी लहान; पण मैत्रिणीप्रमाणे माझ्याशी बोलायच्या. आधार वाटायचा. दुखलंखुपलं, तर औषध सांगायच्या. गद्रे काका लगेच होमिओपॅथीचं औषधही द्यायचे. आमच्या मुलाच्या लग्नात तर त्यांचं घर आमचंच झालं होतं. पुढे नातवंडे होऊन त्यांच्याही मुंजी झाल्या; पण त्यांनी कधी परकेपणा दाखवला नाही. सदैव मदतीचा हात तयार. सासूबाईंशी गप्पा मारतील, तशाच सुनेशी. परीक्षेला जाताना मुलांना भरभरून आशीर्वाद देतील, तशीच कौतुकाची थापही मारतील.
माझे पती पार्किन्सन्सनं आजारी होते. त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता. त्यांना वेळ, काळ काही कळायचं नाही. आठवण आली, की चालले काकांकडे. दोन-तीन मिनिटं बसून परत यायचे. घरात टेकले, की पुन्हा बाहेर निघायचे. दुपारची वेळ आहे, ते झोपले आहेत, आता जाऊ नका, असं सांगितलं, तरी ऐकायचे नाहीत. मी शेवटी वहिनींना म्हटलं, तुम्ही तरी सांगा त्यांना. त्या माझीच समजूत घालायच्या आणि म्हणायच्या, ‘ते चांगले असते, तर असे वागले असते का? आम्हाला काही त्रास होत नाही.’ एकदा आम्ही मुंबईला मुलींकडे राहायला गेलो होतो. तिथंही तिचा दरवाजा उघडून म्हणाले, ‘मी जरा गद्रे काकांकडे जाऊन येतो.’ त्यांना गद्रे काकांची इतकी सवय झाली होती.
वहिनींप्रमाणेच त्यांचा मुलगा, सून मदतीला सदैव तत्पर. त्यांचे सर्व नातेवाईकही अगत्यशील आहेत. काकांची प्रकृती आता तितकी ठीक नसते. त्या दोघांना एकटं ठेवणं बरोबर नाही, म्हणून मुलानं मोठा ब्लॉक घेतला आहे. तिथे ते नुकतेच राहायला गेले. रक्ताची नाती लांब राहतात; पण शेजाऱ्यांशी असलेली प्रेमाची नाती कायम आठवणीत राहतात. त्यांचं इथं नसणं आम्हाला जाणवतं आहे. जन्मोजन्मी आम्हाला असेच शेजारी लाभो, ही प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज