अ‍ॅपशहर

शुक्रवार १० नोव्हेंबर १९६७

Maharashtra Times 10 Nov 2017, 4:00 am
पेंढारकर यांचे निधन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10th november 1967
शुक्रवार १० नोव्हेंबर १९६७


कोल्हापूरः चित्रपट सृष्टीतील व रंगभूमीवरील नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर हे आज रात्री ९-२५ वाजता येथील मेरी वानलेस मिशन हॉस्पिटलात निधन पावले. त्यांचे वय ७२ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते कॅन्सरच्या विकाराने आजारी होते. मृत्यूसमयी त्यांच्यापाशी त्यांचा पुत्र त्यागराज पेंढारकर व पत्नी यांच्याखेरीज व्ही. शांताराम व भालजी पेंढारकर हे होते. बाबूराव पेंढारकर यांच्या मागे दोन पुत्र, दोन कन्या व पत्नी आहेत.

कृष्णा हाथीसिंग कालवश

लंडनः पंडित नेहरूंच्या धाकट्या भगिनी कृष्णा हाथीसिंग या आज पहाटे येथे निधन पावल्या, असे भारताच्या हायकमिशनरांच्या कचेरीतून सांगण्यात आले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० होते. गेले काही दिवस त्या येथील आपल्या एका मैत्रिणीकडे मुक्कामास होत्या. कृष्णा हाथीसिंग यांनी आत्मचरित्र, नेहरू घराण्याचा इतिहास व इतर काही राजकीय लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले आहे. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी कारावास भोगला होता.

आमदारांना अटक

नागपूरः पोलिसांचे कडे तोडून कौन्सिल हॉलच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असता संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या ३४ आमदारांना आज दुपारी एक वाजता अटक करण्यात आली. मागाहून त्यांना सोडून देण्यात आले. अटक केलेल्यात विरोधी पक्ष नेते कृष्णराव धुळप, उद्धवराव पाटील वगैरे होते. महाजन अहवाल जाळून टाका अशा घोषणा देत सर्व समितीचे आमदार मिरवणुकीने आले होते.

लोकसंख्येचा प्रश्न

पुणेः केवळ कायदेशीर गर्भपाताला मान्यता देण्याने लोकसंख्येचा प्रश्न सुटणार नाही. एकूण सर्व समाजाची सर्वांगीण प्रगती झाली तरच हा प्रश्न सुटेल असे मत डॉ. कुमुद दांडेकर यांनी येथे व्यक्त केले. कायद्याने गर्भपातास मान्यता दिली तर ते कार्य करण्यास पुरेशी यंत्रणा नाही. ग्रामीण भागातील स्थिती तर याहून शोचनीय आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या ८० टक्के असून तेथे केवळ २० टक्के वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत. ही विषमता प्रथम दूर झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज