अ‍ॅपशहर

२१ जुलै १९६७

Maharashtra Times 21 Jul 2017, 4:00 am
फक्त २८० दाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21st july 1967
२१ जुलै १९६७


मुंबई - खेडेगावातून स्वस्त धान्यातून मिळणारा तांदूळ किती कमी आहे याचे वर्णन आज विधानसभेत कॉ. रामचंद्र घांगरे यांनी केले. घांगरे म्हणाले, महिन्याकाठी आता जो तांदूळ दिला जातो त्याची दिवसावार विभागणी केली तर दिवसाला फक्त तीन ग्रॅम तांदूळ येतो. तीन ग्रॅम तांदळाची पुडी औषधाच्या पुडीसारखी होते. साधारणतः या पुडीत २८० तांदळाचे दाणे असतात. या तीन ग्रॅम तांदळाचा भात करायचा कसा व खायचा कोणी असा सवाल त्यांनी केला.

दूरचित्रवाणी रेंगाळली

मुंबई - मुंबईत सुरू करण्यात यावयाच्या दूरचित्रवाणीचे गाडे कोणत्या देशाकडून प्रक्षेपण यंत्रसामुग्री (ट्रान्समिटर्स) घ्यावयाची या मुद्यावर अडले असल्यामुळे मुंबईतील दूरचित्रवाणीचे केंद्र दूर राहिले असल्याचे समजते. दूरचित्रवाणीकरिता प. जर्मनी केव्हाही प्रक्षेपण यंत्रसामुग्री द्यावयास तयार आहे. रशिया व अमेरिका हे देशही या केन्द्रासाठी प्रक्षेपण यंत्र देण्यास तयार आहेत. यापैकी कोणाकडून यंत्रे घ्यावयाची, हा प्रश्न आकाशवाणीस पडला आहे.

पी. मधुकर गेले

मुंबई - महाराष्ट्रातील एक ख्यातनाम हार्मोनियमवादक, संगीत दिग्दर्शक व संगीत शिक्षक मधुकर पेडणेकर उर्फ पी. मधुकर यांचे आज सकाळी येथे हृदयविकाराने वयाच्या बावन्नाव्या वर्षी एकाएकी शोचनीय निधन झाले. स्वर दृश्य स्वरूपात दिसावे अशी महत्त्वाकांक्षा बाळगून स्वतःच्या हार्मोनियमला एक काचेची पट्टी बसवून तशी व्यवस्था त्यांनी केली होती. तानपुऱ्यासारख्या हव्या त्या कमी जास्त कायम स्वराची एक पेटी प्रथम त्यांनीच बनविली.

बेकारी विमा योजना

नवी दिल्ली - बेकारी विमा योजना सुरू करण्याचा व कामगारांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी काही उपाय योजण्याचा सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय मजूर व पुनर्वसन खात्याचे मंत्री जयसुखलाल हाथी यांनी आज लोकसभेत सांगितले. देशाच्या औद्योगिक विकासात सहभागी होण्यास कामगारांना आनंद वाटावा यासाठी अनेक गोष्टी करावयास हव्यात हे त्यांनी मान्य केले. वेतन विलंब टाळण्यासाठी पावले उचलण्याचे त्यांनी जाहीर केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज