अ‍ॅपशहर

२३ नोव्हेंबर १९६६

Maharashtra Times 23 Nov 2016, 1:28 am
शंकराचार्यांना अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23rd november 1966
२३ नोव्हेंबर १९६६


नवी दिल्ली -

गोहत्याबंदीसाठी रविवारपासून बेमुदत उपोषण करणारे पुरी-गोवर्धन पीठाचे शंकराचार्य श्री निरंजनदेव तीर्थ यांना अटक करण्यात आल्याने लोकसभेत मोठी खळबळ उडाली. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली शंकराचार्यांना आज सकाळीच अटक करण्यात आली व पाँडेचरीला स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी विमानाने मद्रासला नेण्यात आले, असे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सभागृहास सांगताच जनसंघाच्या अनेक सदस्यांनी व इतर अपक्ष सदस्यांनी रागाने बोलून या अटकेचा निषेध केला. अपक्ष सदस्य लोकनायक माधवराव अणे यांनी घोषणा केली की शंकराचार्यांची सुटका होईतो आपण आमरण उपोषण करू. एन. जी. रंगा म्हणाले की, अणे यांनी उपोषण केल्यास सारा देश पेटून उठेल.

भारतीय चलन चीनकडे?

नवी दिल्ली -

नेपाळने चीनला १६ कोटी रुपयांचे भारतीय चलन देऊन त्या बदल्यात परकीय चलन घेतले, असे जे वृत्त आहे त्याबाबत भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांशी बोलणी करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री दिनेश सिंग यांनी राज्यसभेला सांगितली. भारताने मदत म्हणून दिलेल्या भारतीय चलनाचा नेपाळने दुरुपयोग केला हे वृत्त खरे आहे का आणि त्या चलनाचा चीन उपयोग करीत आहे का असा प्रश्न जनसंघाचे खासदार अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारला होता.

अडीच कोटींची उपासमार

मुंबई -

बिहारमधील सुमारे अडीच कोटी नागरिक उपासमारीच्या संकटात सापडले असल्याचे सर्वोदयी नेते काकासाहेब कालेलकर यांनी वार्ताहरांना सांगितले. श्री. कालेलकर हे बिहारमध्ये बुद्घगया येथे समन्वय आश्रम चालवतात. अलीकडेच त्यांनी बिहारमधील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता दौरा काढला होता.

मोहन रानडे यांचे काय?

नवी दिल्ली -

पोर्तुगीजांच्या तुरुंगात लिस्बन येथे १९६०पासून जन्मठेपेच्या कैदेत खितपत पडलेले मोहन रानडे यांच्या सुटकेस पोर्तुगाल देत असलेल्या नकाराबाबत राज्यसभेत अनेक प्रश्न विचारण्यात आले. परराष्ट्रमंत्री एम. सी. छागला यांनी जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितले की रानडे यांच्या सुटकेसाठी भारताने १९६२पासून प्रयत्न चालवले आहेत. पण पोर्तुगालच्या आडमुठेपणामुळे यश येत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज