अ‍ॅपशहर

२५ जुलै १९६७

Maharashtra Times 25 Jul 2017, 4:00 am
बालगंधर्व हे नवरसस्वामी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25th july 1967
२५ जुलै १९६७


मुंबई - नारायणरावांच्या गळ्यातून जे जे निघाले ते ते पावन झाले असे त्या काळी कसलेले गायक मानीत हे बालगंधर्वांचे खरेखुरे भाग्य, असे नाट्यसमीक्षक श्री. म. केळकर यांनी आज येथे सांगितले. प्रागजी डोसा हे गुजराती साहित्यिक म्हणाले की, मराठी भाषिकांनाच नव्हे, तर गुजराती भाषिकांनाही बालगंधर्वानी आपल्या गंधर्व गायकीने वेड लाविले होते; नवरसाचे ते स्वामी होते.

शेतकऱ्यांना प्राधान्य

मुंबई - लहान शेतकऱ्यांच्या हितालाच महाराष्ट्र सरकार प्राधान्य देत आहे व यापुढेही देणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील कायदे व त्यांची अंमलबजावणी याचे सूत्रही लहान शेतकऱ्यांचे संरक्षण व त्याचा विकास हेच आहे, असा दिलासा महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आज महसूलखात्याच्या मागणीवर झालेल्या चर्चेच्या उत्तरात दिला.

सुपरबाजार महाग

नवी दिल्ली - जुन्या डाळींच्या साठ्यावर सुपर बाजार जादा नफा करीत असल्याचा आरोप नॅशनल कन्झुमर्स सर्व्हिसच्या प्रवक्त्याने केला. या बाजाराने एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर डाळी खरेदी केल्या, तेव्हा त्यांचा भाव सध्यापेक्षा फारच कमी होता. पण आता हा माल जादा भावाने विकून जादा नफा मिळविला जात आहे.

फुले मार्केटमध्ये दारू

मुंबई - महात्मा फुले मार्केट विभागात लिंबू काटा येथे २९ एप्रिल १९६६ रोजी महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्याने छापा घातला असता तेथे मद्यविक्री चालू असल्याचे आढळले, असे हंगामी नगरशासक एस. एम. वाय. शास्त्री यांनी आज मुंबई महापालिकेच्या बैठकीत मान्य केले.

मोहन रानडे यांची भेट

नवी दिल्ली - गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामातील नेते मोहन रानडे यांना भेटण्यास त्यांच्या मातोश्रींना पोर्तुगीज सरकारने आता परवानगी दिली आहे, असे मेक्सिकन सरकारने भारत सरकारला कळविले आहे. पोर्तुगालमधील भारतीय हितसंबंधांची जपणूक मेक्सिकन सरकार करीत असते. मात्र, श्री. रानडे यांच्या सुटकेच्या प्रयत्नास अजून यश आलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज